शहरा लगतची गावे पिंपरी चिंचवड़ महापालिकेत कधी?

शहराची लोकसंख्या २५ लाखांवर आहे.रस्त्यांसह कचरा निर्मूलन आणि सांडपाणी व्यवस्थापनावर ताण येत आहे. यंत्रणा अपूर्ण असल्याने दीड वर्षापासून दिवासाआड पाणीपुरवठा सुरु आहे. भामा - आसखेड धरणातून पाणी आणण्याची प्रक्रिया सुरु आहे.

  पिंपरी: पुणे महापालिकेत २३ गावे समाविष्ट झाली आहेत.त्यामुळे पिंपरी -चिंचवड महापालिकेत समावेश करण्यासाठी प्रस्तावित १८ गावांचा निर्णय कधी, अशी चर्चा शहरात सुरु झाली आहे. शहराच्या पूर्वेकडील निरगुडीपासून पश्चिमेकडील माणपर्यंतच्या गावांचा यात समावेश आहे.हवेली, खेड, मावळ आणि मुळशी या चार तालुक्यांमधील ही गावे आहेत.
  हवेली तालुक्यातील निरगुडी आणि देहू ; खेड तालुक्यातील धानोरे, चऱ्होली खुर्द, आळंदी, केडगाव, कुरुळी,चिंबळी, मोई, खराबवाडी, निघोजे, म्हाळुंगे, येलवाडी ; मावळ तालुक्यातील गहुंजे, सांगवडे आणि मुळशी तालुक्यातील नेरे, जांबे, मारुंजी, हिंजवडी, माण या गावांचा समावेश पिंपरी -चिंचवड महापालिकेत करावा, अशी गेल्या दहा वर्षापासून चर्चा आहे.मात्र, तीर्थक्षेत्र आणि स्वतंत्र ओळख असल्याने आळंदी आणि देहू या गावांतील बहुतांश कारभारी आणि नागरिकांचा महापालिकेत समावेश करण्यास विरोध आहे.

  गहुंजे, सांगवडे, नेरे, जांबे, मारुंजी, हिंजवडी, माण यासह ११ गावे समाविष्ट करण्याबाबतचा प्रस्ताव तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी राज्य सरकारकडे पाठविला आहे.राज्याच्या उपसचिवांनी विभागीय आयुक्तांचा अभिप्राय गेल्या वर्षीच मागविला आहे.तो अभिप्राय प्राप्त झाल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल, असे पत्र उपसचिवांनी महापालिकेला सहा महिन्यांपूर्वीच पाठविले आहे अद्याप पुढील कार्यवाही झालेली नाही.

  सध्या शहराची लोकसंख्या २५ लाखांवर आहे.रस्त्यांसह कचरा निर्मूलन आणि सांडपाणी व्यवस्थापनावर ताण येत आहे. यंत्रणा अपूर्ण असल्याने दीड वर्षापासून दिवासाआड पाणीपुरवठा सुरु आहे. भामा – आसखेड धरणातून पाणी आणण्याची प्रक्रिया सुरु आहे. असे असताना आणखी काही गावांचा महापालिकेत समावेश झाल्यास सुविधा पुरविण्यास यंत्रणा कमी पडून प्रशासनावरील ताण वाढेल, अशीही चर्चा सुरु आहे.

  रिंगरोडला विरोध
  आमची अकरा गावे महापालिकेत समाविष्ट करण्यास आमची तयारी आहे.मात्र, आमच्या गावांमधून पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) रिंगरोड प्रस्तावित केला आहे, त्याला आमचा विरोध आहे.भुमिपुत्रांचे नुकसान होणार असल्याने रिंगरोडला आमचा विरोध असल्याने सरपंचांनी सांगितले.