शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे
शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे

    पुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिल्लीवारी करून लोकांना वेड्यात काढले आहे, अशी टीका शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी केली आहे. मराठा आरक्षणासाठी जनजागृती करण्यासाठी येत्या २७ जून रोजी मुंबईत दहा हजार मोटार सायकलींची रॅली काढण्यात येणार आहे, अशी माहिती विनायक मेटे यांनी दिली.

    यापेक्षा निष्क्रियपणा दुसरा कोणता

    प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, मराठा आरक्षणासाठी आम्ही गप्प बसणार नाही. प्रत्येक जिल्ह्यात तज्ज्ञांच्या बैठका घेण्यात येईल. त्यानंतर जिल्हानिहाय मेळावे आणि मोर्चे काढण्यात येणार आहे. हे मेळावे मूक असणार नाहीत. तर बोलके असतील. न्याय मागणारे असतील. संघर्ष करणारे असतील, असे सांगत मेटे म्हणाले की, भोसले कमिटीप्रमाणेच आम्ही कायदे तज्ज्ञांची समिती स्थापन करणार आहोत. समाजाच्यावतीने ही समिती नेमली जाईल. येत्या आठ दिवसात या समितीची घोषणा केली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. मेटे म्हणाले की, पाच मे रोजी आरक्षण रद्द झाले. एक महिना उलटला तरी सरकारने फेरविचार याचिका दाखल केली नाही. यापेक्षा निष्क्रियपणा दुसरा कोणता असू शकतो.

    काही तरी करतोय हे दाखवण्यासाठी भेट

    माजी न्यायामूर्ती भोसले यांच्या समितीने सांगितलेले ऐकायचे नाही. आमचे ऐकायचे नाही याचाच अर्थ सरकारला मराठा आरक्षणाचे देणेघेणे नाही. केवळ दिल्लीला जाऊन ठाकरे-चव्हाणांनी लोकांना वेड्यात काढले आहे. दिल्ली भेटीत मराठा आरक्षणाचा विषय तोंडी लावायला होता. राज्यात मराठा समाजाचा रोष वाढल्यामुळे दिल्ली भेट झाली. काही तरी करतोय हे दाखवण्यासाठी ही भेट होती. प्रत्यक्षात मराठा समाजासाठी काहीच केले नाही, असे मेटे म्हणाले.

    पुण्यातून राज्यव्यापी दौऱ्याची सुरुवात

    मराठा समाजाच्या मागण्या सरकारने मान्य केल्या पाहिजेत. मागण्या मान्य न झाल्यास अधिवेशन चालू देणार नाही, असं सांगतानाच येत्या २७ जून रोजी मुंबईत दहा हजार मोटारसायकलची रॅली काढण्यात येणार आहे. मराठा समाजात जनजागृती करण्यासाठी ही बाईक रॅली काढण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. मराठा आरक्षणासंदर्भात समाजाची जनजागृती करण्यासाठी पुण्यातून राज्यव्यापी दौऱ्याची सुरुवात करण्यात येणार आहे. पुण्यातून नगर नंतर उद्या औरंगाबाद, जालना, सोलापूरमध्ये जाऊ. दुसऱ्या टप्प्यात रायगड, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा आदी ठिकाणी जाणार आहोत. प्रत्येक जिल्ह्यात मोर्चा, मेळावा काढण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

    मुख्यमंत्र्यांना समाजाबद्दल आस्था नाही

    मुख्यमंत्र्यांना मराठा समाजाबद्दल आस्था नाही म्हणून त्यांनी अजून मराठा समाजाची बैठकही बोलावली नाही. मराठा समाजाच्या मागण्या मान्य करण्यात काही आडकाठी आहे का? असेल तर मुख्यमंत्र्यांनी तसे जाहीर करावे, असे मेटे म्हणाले. छत्रपती शिवाजी भवन किंवा मराठा भवन प्रत्येक जिल्ह्यात सुरू करावे, त्यात सारथीचे उपकेंद्र असले पाहिजे, अण्णासाहेब पाटील महामंडळाचे केंद्रही असले पाहिजे, असे सांगताना हे सरकार मराठा समाजातील काही लोकांचा वापर करत आहे. अशोक चव्हाण नाकर्ते आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.