वाघोली जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे यांच्याकडून लसीकरण केंद्राचा आढावा

  वाघोली : ज्येष्ठ नागरिकांसह अपंग, दिव्यांग आणि गंभीर आजार असणाऱ्यांना त्यांच्या घरी जाऊन जागेवर कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्याचा अध्यादेश जिल्हा आरोग्य विभागाने जारी केला आहे. त्यानंतर वाघोली येथील लसीकरण केंद्राचा आढावा जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी घेतला. यादरम्यान त्यांनी आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांशीही संवादही साधला.

  यावेळी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्‍वर कटके, कृषी पशुधन विभागाचे सभापती बाबुराव वायकर, वैद्यकीय अधिकारी वर्षा गायकवाड, डॉ. हरिष लोहार, डॉ. नागसेन लोखंडे आदी उपस्थित होते. पानसरे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र बीजेएस कोरोना केअर सेंटर, लसीकरण या ठिकाणी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला.

  ज्ञानेश्वर कटके यांनी वाघोली येथील कोरोनाची स्थिती सुरवातीपासुनच अतिशय योग्य पद्धतीने हाताळली आहे. या ठिकाणी कोरोना केअर सेंटर सुरू करण्यापासून स्वॅब घेण्याची सुविधा, विलगीकरण ते आता लसीकरण याबाबत प्रशासनाकडे त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. लसीकरण केंद्र सुरू असताना फिरते केंद्र, तसेच ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग यांना त्यांच्या घरी जाऊन लस देण्याचा उपक्रम त्यांनी सुरू केला होता. त्याच पार्श्‍वभुमीवर जिल्हा परिषदेने अध्यादेश काढत अशा पद्धतीने लसीकरण करण्यास मान्यता दिली असल्याची चर्चा या आढावा दौऱ्यात रंगली होती.

  लसीकरणाला वेग

  वाघोली लसीकरण केंद्रात आत्तापर्यंत २१,५४० पेक्षा अधिक नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. यामध्ये अत्यावश्‍यक सेवेत काम करणारे कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक व इतर नागरिकांचा समावेश आहे. लसीकरणासाठी नागरिकांनी आधारकार्ड किंवा ओळखीच्या पुराव्यासह केंद्रावर जावे, अधिक माहितीसाठी ८३८००४००८१ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधवा.

  सात रुग्णालयांना लसीकरणाची परवानगी

  वाघोली परिसरात आणखी एक किंवा दोन शासकीय लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी असून परिसरातील सात खासगी रुग्णालयांना लसीकरणाची परवानगी मिळवली आहे. शासकीय आणि खासगीरित्या लसीकरण सुरू असलेले वाघोली एकमेव गाव असावे, असे जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्‍वर कटके यांनी सांगितले.