काळेपडळमधील पाणी प्रश्न लवकरच मार्गी : नगरसेवक घुले

    हडपसर : काळेपडळ भागातील अनेक ठिकाणच्या मुख्य रस्त्यावर पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणावर साचत असल्याने नागरिकांच्या घरात पाणी शिरत आहे. त्यामुळे या भागातील मुख्य रस्त्यावर तातडीने पावसाळी वाहिनी टाकण्यात येणार असून, प्रभाग क्रमांक २६  काळेपडळ भागातील पाणी प्रश्न लवकर मार्गी लावणार असल्याचे आश्वासन या भागातील स्थानिक नगरसेवक संजयतात्या घुले यांनी दिले.

    म्हसोबा मंदिर डीपी रोड, जोगेश्वरी कॉलनी एक आणि दोन गणेश कॉलनी, त्रिमुर्ती कॉलनी, गजानन कॉलनी व ड्रिम्स आकृतीसमोर सर्व भागात दरवर्षी पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणावर साचत आहे. प्रत्येक गल्लीमध्ये पूर्णपणे पावसाचे पाणी साचलेले असते. त्यामुळे गल्लीतील सर्व रहिवाशांचे खूप हाल होतात. येथील होत असलेल्या पाऊसाच्या समस्येवर डीपी रोडला पावसाळी लाईन टाकण्याची गरज असल्याचे घुले यांनी सांगितले. लवकरच या भागातील पाणी प्रश्न, पाणी टाकीचे राहिलेले काम मार्गी लावून पिण्याचा प्रश्न लवकर मिटणार आहे. तसेच पावसाळी वाहिनी तातडीने टाकण्यात येणार असून, येथील दोन्ही प्रश्न मार्गी लावणार असल्याचे त्यांनी सांगितले.

    संजय तात्या घुले, योगेश सूर्यवंशी, पुणे मनपाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली. लवकरात लवकर या ठिकाणी पावसाळी लाईन टाकण्यात येणार आहे. काळे बोराटे नगर सिलिंग पार्क पाण्याच्या टाकीसाठी पुण्याचे महापौर मुरळीधर मोहोळ यांना घुले यांनी निवेदन दिले. त्यावेळी नगरसेवक घुले, तुषार पाटील, योगेश सूर्यवंशी, संजय भुजबळ आदी उपस्थित होते.