खडकवासला, कळमोडी, वीर धरणातून पाणी सोडले

पुणे: जिल्हयातील खडकवासला, वीर आणि कळमोडी ही तीन धरणे शंभर टक्के भरल्यानंतर त्यातून पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील बहुतांश भागात पावसाने चांगली हजेरी लावली आहे.

धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार तर काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत असल्याने धरणातील पाणी पातळीत वाढ होत आहे. गुरूवारी जिल्हयातील खडकवासला, कळमोडी आणि वीर या तीनधरणातून अनुक्रमे मुठा व भिमा, निरा नदीत पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

जिल्हयाच्या पश्चिम भागात असलेल्या बहुतेक धरणातील पाणी साठ्यात समाधान कारक वाढ झाली आहे. वडिवळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ९१ मिलिमीटर , मुळशी धरणाच्या पाणलोटक्षेत्रात ७८, टेमघर ७५, पवना ६८, पानशेत ८२, वरसगाव ८१ , गुंजवणी ६०, कळमोडी ३७, आंध्रा ३५, भामाआसखेड २७, कासारसाई २२,

माणिकडोह २३, डिंभे २१, पिंपळगाव जोगे २१, निरा देवधर ३८ चासकमान १८, भाटघर १८, खडकवासला २९, नाझरे सहा, वीर पाच मिलिमीटर पाऊस झाला आहे.यामुळे नद्या, नाल्या दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे धरणातील पाणी पातळीत झपाट्याने वाढल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे.

आत्तापर्यत कळमोडी, खडकवासला, वीर ही तीन धरणे शंभर टक्के भरली आहेत. तर आंध्रा, कासारसाई, गुंजवणी या तीन धरणात जवळपास ९० टक्केपर्यतभरली आहेत.

सध्या वीर धरणामधून नीरा नदी मध्ये ८०० क्यसेक्स विसर्ग विद्युतगृहातुन सुरू आहे. धरणातुन सोडण्यात येणा-या विसर्गमधे वाढ करुन तो २३ हजार १२० क्युसेक्स पर्यंत वाढविण्यात आला. तर खडकवासला धरणातून ११ हजार ७३५ क्युसेक्स पाणी नदीत सोडले जात आहे. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला या चार धरणातील एकुण पाणी साठा २० टिएमसी च्या पुढे गेला आहे.