विक्रमी उत्पादन पण अमाप खर्चाने तोटाच; कलिंगड उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा

    कवठे येमाई : कवठे येमाई शिरूरच्या पश्चिमेकडील बारमाही बागायती क्षेत्र असलेल्या बेट भागातील माळवाडीचे प्रगतशील शेतकरी सीताराम भाकरे यांनी आपल्या १ हेक्टर क्षेत्रात जीवापाड मेहनत घेत  व अमाप खर्च करीत कलिंगडाचे १०० टन उत्पादन घेतले. पण खर्चाच्या तुलनेत पिकास योग्य भाव व उत्पन्न न मिळाल्याची खंत, व्यथा, दुःख भाकरे यांनी व्यक्त केली.

    माळवाडी येथील आपल्या शेतीत दशरथ सीताराम भाकरे यांनी १ हेक्टर क्षेत्रावर कलिंगड पिकाची नियोजनबद्ध लागवड केली होती. त्यासाठी त्यांना रोपांसाठी ४५ हजार रुपये, मल्चिंग पेपरसाठी १५ हजार रुपये खर्च आला. त्यानंतर रोपांसाठी बेड बनवले व ते शेतात अंथरण्यास ७ हजार रुपये, ठिबकसाठी २० हजार, खतासाठी १३ हजार, फवारणीसाठी १५ हजार, तसेच तोडणी करण्यासाठी ३५० रुपये प्रतिटन याप्रमाणे ३५ हजार रुपये खर्च केला.  सुमारे तीन महिने जीवापाड मेहनत, काबाडकष्ट करूनही आणि एकूण दीड लाख रुपये खर्च कलिंगड पिकास करून व १०० टन उत्पादन घेऊनही केवळ खर्चाचा ताळमेळ बसला. पण हाती शिल्लकच आली नाही. त्यामुळे शेतात कष्ट करून चीज न झाल्याचे अतीव दुःख भाकरे यांनी व्यक्त केले.

    लॉकडाऊनमुळे सर्वच शेतीमाल कवडीमोल भावाने विकावा लागत आहे. त्यामुळे सरकारने शेतीमालाला हमीभाव द्यावा, अशी मागणी माजी आमदार पोपटराव गावडे, राज्य बळीराजा शेतकरी संघटनेचे पुणे जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष जयवंतराव भाकरे, तालुका अध्यक्ष सोनभौ मुसळे, शिरूर पंचायत समिती सदस्या अरुणा घोडे व शेतकऱ्यांमधून होत आहे.