जिवंत काडतुसांचा शस्त्रसाठा जप्त; चार आरोपी अटकेत

खंडणी विरोधी पथकाकडून सराईत गुन्हेगारांची माहिती एकत्रित करण्यात येत होती. त्यावेळी जळगावमधून एकजण पिस्तूलांची विक्री करण्यासाठी पुणे रेल्वे स्टेशन परिसरात आल्याची माहिती पोलिस अमंलदार सचिन अहिवळे यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून भूषण मराठेला ताब्यात घेतले.

    नवराष्ट्र न्यूज नेटवर्क, पुणे.

    जळगावहून पुण्यात शस्त्रांची विक्री करण्यासाठी आलेल्या चार आरोपींना खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून ८ देशी बनावटीचे पिस्तुल, १५ जिवंत काडतुसे असा ४ लाख ३० हजारांचा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. भूषण महेश मराठे, राहुल चंद्रकांत पवार, तौफिक गुलाब शेख आणि राम गोरोबा जाधव अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

    खंडणी विरोधी पथकाकडून सराईत गुन्हेगारांची माहिती एकत्रित करण्यात येत होती. त्यावेळी जळगावमधून एकजण पिस्तूलांची विक्री करण्यासाठी पुणे रेल्वे स्टेशन परिसरात आल्याची माहिती पोलिस अमंलदार सचिन अहिवळे यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून भूषण मराठेला ताब्यात घेतले. त्याच्याकडून ३ पिस्तूल आणि ६ जिंवत काडतुसे जप्त करण्यात आली. चौकशीत त्याने पुणे शहरासह ग्रामीण भागामध्ये पिस्तुलांची विक्री केल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाला दिली.

    त्यानुसार पथकाने राहुल पवार, तौफिक शेख, राम जाधव यांना अटक केले. त्यांच्याकडून ५ पिस्तूल आणि काडतुसे जप्त करण्यात आली. राहुल पवार सराईत गुन्हेगार असून राजगड पोलिस ठाण्यातंर्गत त्याच्याविरूद्ध ५ गंभीर गुन्हे दाखल आहेत. आरोपींनी परराज्यातील टोळीकडून पिस्तुल पुरविण्यात येत आहे का, यासंदर्भात तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.