नक्की कोणत्या झिंगेत आहात? एकदा बारामती पाहाच;निलेश राणेंना राष्ट्रवादी युवकचे मासाळ यांचे खुले आव्हान

आपण कधीही घराचे दार उघडून बाहेर पडत नसाल, त्यामुळे अजितदादा यांनी महाराष्ट्रभर केलेले सामाजिक काम आपल्या निदर्शनास आले नसेल, तरीही सततच्या पराभवाने आपण वैफल्यग्रस्त झाला असल्याने कोणत्या झिंगेत आपण वक्तव्य करता? हे समजत नाही. तरी आपण थोडीशी झिंग बाजुला ठेवून वेळातवेळ काढून बारामती पाहण्यासाठी आलात, तर बरे होईल.

बारामती: माजी खासदार नीलेश राणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केलेल्या टीकेला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष किशोर मासाळ यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.निलेश राणे तुम्ही बारामतीत येऊन अजितदादांनी बांधलेल्या वास्तू व बारामतीमध्ये निवडून आणलेले ग्रामपंचायत सदस्य पाहायला बारामती या, असे जाहीर आव्हान पत्राद्वारे राणे यांना दिले आहे.सततच्या पराभवामुळे वैफल्यग्रस्त झाला असल्याने नक्की कोणत्या झिंगेत आपण वक्तव्य करता, हेच समजत नाही, असा टोला मासाळ यांनी मारला आहे.

अजित पवार यांच्या नावावर एकही ग्रामपंचायत सदस्य निवडून आला नाही, त्यांच्याकडून कसलीही कामे झालेली नाहीत ,अशी टीका निलेश राणे यांनी केली होती. या टीकेला किशोर मासाळ यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.या पत्राद्वारे किशोर मासाळ म्हणतात, मुख्यमंत्री नारायण राणे यांचे चिरंजीव आपण आहात , राणे साहेबांना मानणारा महाराष्ट्रात एक वर्ग आहे,परंतु कोणत्याही अर्धवट ज्ञानाच्या आधारे आपण जे नेहमीच बरळत असता, त्यामुळे निश्चित राणे साहेबांना देखील आपल्या राजकीय अज्ञानामुळे वाईट वाटत असेल ,असो !
पत्र लिहण्याचे कारण आपण कधीही घराचे दार उघडून बाहेर पडत नसाल, त्यामुळे अजितदादा यांनी महाराष्ट्रभर केलेले सामाजिक काम आपल्या निदर्शनास आले नसेल, तरीही सततच्या पराभवाने आपण वैफल्यग्रस्त झाला असल्याने कोणत्या झिंगेत आपण वक्तव्य करता? हे समजत नाही. तरी आपण थोडीशी झिंग बाजुला ठेवून वेळातवेळ काढून बारामती पाहण्यासाठी आलात, तर बरे होईल. आपल्या डाॅक्टर डिगरीच्या ज्ञानात निश्चित भर पडेल. आपण बारामती मध्ये आल्यानंतर कधी न पाहिलेल्या वास्तू आणी इथल्या नागरीकांच्या सुखसोयी पाहून जी झिंग आपल्याला येईल, ती खरोखरच पाहण्यायोग्य असेल . आपल्या वाचनात किंवा ऐकण्यात पण न आलेली बारामती स्वतः पंतप्रधान मोदी साहेबांनी व आपल्या लहान बंधु आमदार नितेश राणे यांनी बारामती पाहून आमच्या वास्तुंचे तोंड भरुन कौतुक केले आहे. आपण त्यांच्याकडून जरी माहिती घेतली असती ,तरी आपण असे बालीशपणाचे वक्तव्य केले नसते.
अजितदादांवर बोलताना फक्त एका माजी मुख्यमंत्री यांचे चिरंजीव असल्याने आपल्या वक्तव्याला मिडीयाने महत्व दिले आहे. पण आपण स्वतः किती महाराष्ट्रातील जनतेसाठी योगदान दिले ,हे देखील महाराष्ट्राला समजने बाकी आहे.आपण बारामतीमध्ये आल्यानंतर आपल्याला बारामती फिरवून दाखविण्यासाठी अजितदादा यांनी निवडून आणलेले ग्रामपंचायत सदस्य हजर असतील, आपली एक जंगी सभाच होऊन जाईल ! असे किशोर मासाळ यांनी म्हटले आहे.