जेव्हा मुलींची सहल कर्जतच्या पोलीस ठाण्यात जाते तेव्हा..

कर्जत पोलिसांचा स्तुत्य उपक्रम;मुलींनी घेतली कामकाजाची माहिती

    कर्जत : मुली-महिलांनी निर्भय व्हावं…आपल्याला होणाऱ्या त्रासाची माहिती न घाबरता पोलिसांना सांगावी…आपल्या संरक्षणासाठीच पोलिस बांधव २४ तास आपल्या सेवेत आहेत… आपल्या कुटुंबाप्रमाणेच हक्कानं त्यांना आपल्या अडचणी सांगाव्यात!

    मुली-महिलांना बोलतं आणि निर्भय करण्यासाठी महिला दिनाचे औचित्य साधुन कर्जत पोलिसांनी सहलीचे आयोजन केले होते. ही सहल सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरली आहे.मुलींच्या कोणत्याही प्रश्नांबाबत सतर्क असलेल्या पोलिस यंत्रणेवर शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थिनिंचा विश्वास वाढला आहे. कर्जत येथील दादा पाटील महाविद्यालय,अमरनाथ विद्यालय,कोटा इंग्लिश मिडीयम स्कूल,डायनॅमिक स्कूल,कन्या शाळा येथील तब्बल २०० मुलींनी व शाळेतील महिला शिक्षिकांनी पोलीस ठाण्याच्या कामकाजाचा आढावा घेतला.पोलिसांत तक्रार कशी दाखल करून घेण्यात येते, महिला कशा प्रकारे तक्रार देऊ शकतात, भरोसा सेल काय काम करते, ठाणे अंमलदार,गुन्हेगारी कक्ष, गोपनीय विभाग, तपासी अंमलदार याबाबतची सखोल माहिती पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली.पोलीस कर्मचारी शबनम शेख,मनोज लातूरकर,अमित बर्डे आदींनीही पोलिसांच्या कामकाजाची माहिती समजावून सांगितली.या आगळ्या वेगळ्या उपक्रमातुन मुली व महिलांची भीती कमी झाली आहे.मुलींना राहत्या परिसरात,बस स्थानकावर,प्रवासात येता-जाता, शाळा-महाविद्यालयाच्या परिसरात,ओळखीच्या नातेवाईकांकडून,अनोळखी फोन तसेच सोशल मिडीयाच्या व्हाट्सऍप माध्यमातून त्रास होत असतो.परंतु बदनामी, शाळा कायमची बंद होण्याच्या भीतीने कसलीही तक्रार न देता निमूटपणे अन्याय सहन करतात मात्र पोलीस आपले बांधव आहेत असे समजून मुलींनी निर्भय बनावे असे आवाहन चंद्रशेखर यादव यांनी केले आहे.कर्जत पोलिसांनी नियोजित केलेल्या या सहलीने मुली भारावून गेल्या होत्या.

    शाळा-महाविद्यालयात जाऊन निर्भयतेचे धडे!
    तालुक्यातील शाळा व महाविद्यालयात स्वतः पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव हे जात असून मुलींना निर्भयतेचे धडे देत आहेत.आपला वैयक्तिक मोबाईल क्रमांक उपलब्ध करून त्यांना अभय देत आहेत.त्यामुळे त्रास देणाऱ्या अनेक टवाळखोरांनी धास्ती घेतली आहे.आता शाळा-महाविद्यालयातील मुली मोकळा श्वास घेत आहेत.