सम्राट कंपनीवर कारवाई कधी होणार?

कुरकुंभ : कुरकुंभ औद्योगिक वसाहतमधील सम्राट कंपनीने कंपनीबाहेर दूषित दुर्गंधीयुक्त सांडपाणी सोडले होते, याबाबत प्रदूषण नियंत्रण विभागाच्या पुणे (Maharashtra Pollution Control Board)अधिकाऱ्यांनी संबंधित कंपनी बाबत प्रस्ताव वरिष्ठ कार्यालय मुंबई येथे पाठवले आहे परंतु या कंपनीवर कधी आणि कोणती कारवाई होणार याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

सम्राट पेपर मिल या कंपनीने कंपनीच्या बाहेर दूषित दुर्गंधीयुक्त सांडपाणी सोडले होते. याची बातमी ‘दैनिक नवराष्ट्र’ या वृत्तपत्राने प्रसिद्ध केली होती. या बातमीची दखल घेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सूर्यकांत शिंदे यांनी पाहणी करून पंचनामा केला. तसेच सम्राट कंपनीने केलेल्या जलप्रदूषणाचे गंभीर दखल घेत प्रदूषण नियंत्रण विभागाचे उपप्रादेशिक अधिकारी प्रताप जगताप यांनी कंपनीची पाहणी केली होती .या अनुषंगाने प्रदूषण नियंत्रण विभागाच्या वरिष्ठ कार्यालयातील प्रादेशिक अधिकाऱ्यांना संबंधित कंपनी संदर्भात प्रस्ताव पाठवला असल्याचे प्रदूषण नियंत्रण विभागाचे उपप्रादेशिक अधिकारी प्रताप जगताप यांनी सांगितले.
याच कंपनीला काही महिन्यांपूर्वी प्रदूषण विभागाने कंपनीचे उत्पादन , तसेच पाणी, वीज का बंद करू नये असे कारणे दाखवा नोटीस दिले होते.परंतु या कंपनीवर काहीच कारवाई झाली नसल्याचे ग्रामस्थांमधून बोलले जात आहे.

सम्राट कंपनीवर कारवाई संदर्भात प्रस्तावावर कधी अमलबजावणी होणार. तसेच प्रस्तावाचा कचरा होणार की कारवाईचे कागदी घोडे नाचवणार असे प्रश्न उपस्थित केले जात आहे.

सम्राट कंपनीने कंपनीच्या बाहेर असणाऱ्या औद्योगिक वसाहतीच्या जागेत दूषित सांडपाणी सोडल्याने हे दूषित सांडपाणी थेट येथील असणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतात जात होते .या पाण्याने अनेक शेती नापीक झाल्या आहेत. प्रदूषण नियंत्रण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सम्राट पेपर मिल कंपनीवर आठ दिवसात कारवाई करतो असे तोंडी आश्वासन दिले होते . परंतु तीन आठवडे कालावधी झाला तरी या संबंधित प्रदूषण करणाऱ्या कंपनीवर कारवाईला विलंब का असा सवाल येथील नागरिक करत आहे.

“संबंधित कंपनी संदर्भात अहवाल आम्हाला मिळाला असून लवकरात लवकर कारवाई होईल “
-जे. बी संगेवार,प्रादेशिक अधिकारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ