औद्योगिक वसाहतीस अग्निशामक यंत्र कधी मिळणार? कंपन्यांच्या संरक्षणासाठी पुरेशी नाही यंत्रणा

कंपनीला आग लागल्यानंतर सर्वांना अग्नीशामक बंबाची आठवण होत असून सणसवाडी औद्योगिक वसाहतीला कायमस्वरूपी अग्निशमक बंब कधी भेटणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.सणसवाडी (ता. शिरूर) येथे मोठी औद्योगिक वसाहत असून शेकडो कंपन्या या ठिकाणी उभारलेल्या असताना देखील पुरेशी यंत्रणा औद्योगिक वसाहतिकडे उपलब्ध नसल्याने मोठ्या प्रमाणात हानी होत आहे

  शिक्रापूर : सणसवाडी (ता. शिरूर) येथे मोठी औद्योगिक वसाहत असून शेकडो कंपन्या या ठिकाणी उभारलेल्या असताना देखील पुरेशी यंत्रणा औद्योगिक वसाहतिकडे उपलब्ध नसल्याने मोठ्या प्रमाणात हानी होत आहे.कोणत्याही कंपनीला आग लागल्यानंतर सर्वांना अग्नीशामक बंबाची आठवण होत असून सणसवाडी औद्योगिक वसाहतीला कायमस्वरूपी अग्निशामक बंब कधी भेटणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.

  सणसवाडी (ता. शिरूर) सह परिसरातील कोरेगाव भीमा, शिक्रापूर, वढू बुद्रुक, पिंपळे जगताप, करंदी, तळेगाव ढमढेरे, डिंग्रजवाडी येथे मोठ्या प्रमाणात औद्योगिक वसाहत उभी राहिलेली असून येथे शेकडो कंपन्या उभ्या राहिलेल्या आहेत. यामध्ये असंख्य आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपन्या देखील आहेत कित्येक कंपन्यांच्या वतीने कंपनीचा सिएसआर फंड बाहेरील गावांना अथवा संस्थेंना देणगी रुपात दिला जात आहे. कंपन्यांच्या सोयीसाठी काही यंत्रणा उभारण्यास कंपन्या मागे पडत असल्याचे दिसून येत आहे. यापूर्वी अनेकदा सणसवाडी परिसरातील अनेक कंपन्यांना आग लागण्याचे प्रकार घडलेले असून कंपन्यांना आग लागण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत मात्र एखाद्या कंपनीला आग लागल्यानंतर येथील आग विझविण्यासाठी जवळील रांजणगाव गणपती औद्योगिक वसाहत तसेच वाघोली येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातील तसेच पुणे महानगर पालिकेकडील अग्निशमक दल बोलवावे लागत आहेत. येथील अग्निशमक दल घटनास्थळी दाखल होई पर्यंत मोठ्या प्रमाणात वेळ वाया गेलेला असल्याने आगीमुळे कोट्यावधी रुपयांचे नुकसान होत असते. मात्र अनेकदा आग लागल्याच्या घटना घडल्यानंतर येथे अग्निशमक दल उभारण्याची चर्चा केली जाते. मात्र नंतर सर्वांना त्याबाबतचा विसर पडलेला असल्याचे दिसून येथे मात्र सणसवाडी व परिसरात पाचशेहून अधिक लहान मोठ्या कंपन्या असताना येथे अग्निशमक दल उभा राहणे काळाची गरज आहे. याकडे कोणतीही कंपनी गांभीर्याने लक्ष देत नाही त्याचा तोटा देखील कंपन्यांनाच होत असतो.मात्र सणसवाडी परिसरातील औद्योगिक वसाहतसाठी कायमस्वरूपी अग्निशमक यंत्रणा उपलब्ध कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

  अग्निशमक दल उभारणीसाठी प्रयत्नशील सणसवाडी व कोरेगाव भीमा औद्योगिक वसाहतमध्ये अग्निशमक यंत्रणा उभारणीसाठी यापूर्वी वरिष्ठ कार्यालयांना पत्रव्यवहार केलेला असून पुढील काळात सणसवाडी परिसरातील औद्योगिक वसाहतमध्ये अग्निशमक यंत्रणा उभारणीसाठी प्रयत्नशील आहे.

  - अशोक पवार,आमदार

  कंपन्यांच्या भिंती व इमारतींचीच अडचण
  एखाद्या कंपनीला आग लागल्यानंतर आगीच्या ठिकाणी अग्निशमक बंब पोहोचण्यासाठी मोठ्या अडचणी येत असून त्यामध्ये कंपन्यांनी संपूर्ण जागेमध्ये केलेले बांधकाम तसेच कोणत्याही बाजूने न सोडलेला रस्ता यामुळे कोठे आग लागल्यास आग विझविण्यासाठी कंपन्यांच्या भिंती व इमारतींचीच मोठी अडचण निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे.