कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक होणार तरी कधी?; तालुक्यातील जनतेला प्रश्न

  उरुळी कांचन : कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे निवडणूक कधी होणार? तालुक्यात कोणी संचालक पदासाठी लायक नाही का? असा अन्याय बारामतीसह अन्य तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी सहन केला असता का? सहकार कसाही वापरायचा का? या तालुक्यातील जुन्या जाणत्या नेत्यांनी स्थापन केलेल्या सहकारी संस्थांवर आपलेच वर्चस्व असावे ही मनमानी चालते. मग तेथे लोकनियुक्त शेतकरी प्रतिनिधी संचालक म्हणून का नकोत ? असे अनेक प्रश्न तालुक्यातील जनतेला पडले आहेत.

  महाराष्ट्रातील सहकार विश्वातील हवेली (पुणे) कृषी उत्पन्न बाजार समिती ही एकमेव संस्था अशी असेल की या संस्थेवर गेल्या सुमारे १८ वर्षांपासून प्रशासक आहे. त्यामुळे हवेली तालुक्यात या संस्थेचा कारभार करण्यासाठी लायक कार्यकर्ते नाहीत. असाच संदेश राज्यातील सहकार क्षेत्रात गेल्याशिवाय राहत नाही व हवेली तालुक्यातील दूर दृष्टीकोन असलेल्या कै. अण्णासाहेब मगर, कै. डॉ. मणिभाई देसाई, कै. दत्तोबा (अण्णा) कांचन, कै. शिवाजीनाना घुले, कै.विठ्ठलराव तुपे, कै. शिवाजीराव कोंडे यांच्यासारख्या एकेकाळी महाराष्ट्राला दिशा देण्याचे काम करणाऱ्या नेत्यांवर त्यांच्या गैरहजेरीत अन्याय केला जात आहे. ही बाब हवेली तालुक्याच्या दृष्टीने अतिशय लाजिरवाणी अशीच आहे, अशी प्रतिक्रिया तालुक्यातील सर्वच पक्षातील जिल्हा, तालुका पातळीवर काम करणारे नेते व कार्यकर्ते नाव न टाकण्याच्या अटीवर प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त करीत आहेत.

  हवेली (पुणे) कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक केव्हा होणार असा प्रश्न हवेली तालुक्यातील सहकार व स्थानिक स्वराज्य संस्था क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना पडला असून या तालुक्यातील कार्यकर्त्यांवरचा अन्याय दूर होणार आहे का नाही असा सवाल तालुक्यातील सर्वपक्षीय कार्यकर्ते विचारत आहेत, हा प्रश्न लवकर निकालात काढला नाही. तर येत्या काळात राज्यकर्त्यांना मोठ्या उद्रेकाला सामोरे जावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

  तसेच फक्त हवेलीकरांवरच हा अन्याय का असा सवाल राजकीयदृष्ट्या सधन असलेल्या हवेली तालुक्यातील सर्वच पक्षांचे कार्यकर्ते करू लागले आहेत, असा अन्याय बारामती वा तत्सम अन्य तालुक्यातील पुढारी आणि कार्यकर्ते यांनी सहन केला असता का ? असा सवाल विचारला जात आहे.
  गेल्या १८ वर्षात या संस्थेवरचे प्रशासक राज न संपवता अनेकप्रकारे तेथे कधी आपल्या मर्जीतील कार्यकर्त्यांचे मंडळ तर कधी मर्जीतील अधिकारी प्रशासक असाच खेळ चालवून हवेलीतील जनतेवर अन्याय करण्याचे काम आघाडी, युती व महाविकास आघाडी सरकारने आजपर्यंत केला असल्याने हवेली तालुक्यातील कार्यकर्ते आपआपल्या नेत्यांवर तीव्र नाराजी व्यक्त करीत आरडाओरड करू लागले आहेत. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व पुणे जिल्हा दूध संघ या संस्थेच्या निवडणुकीवर या विलंबाचा नक्कीच परिणाम होणार असल्याने ती निवडणूक अगोदर होणे तालुक्यातील कार्यकर्त्यांना अपेक्षित आहे.

  अधिकृत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उच्च न्यायालयाने पूर्वी निवडणुकीला दिलेली स्थगिती नव्या कायद्याप्रमाणे व नियमावलीने निवडणुका घेण्यासाठी उठवणे गरजेचे आहे. यासाठी याचिकाकर्ते किंवा शासनकर्ते यापैकी कोणीतरी परत उच्च न्यायालयात जाणे गरजेचे आहे. त्याशिवाय निवडणूक प्रक्रिया सुरु होऊ शकत नाही.

  याबाबत महाराष्ट्र राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणचे सचिव यशवंत गिरी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, राज्यातील बाजार समित्यांच्या निवडणुकांसाठी पूर्वी असलेले निवडणूक निर्णय अधिकारी म्हणजे जिल्हाधिकारी यांच्याऐवजी त्या-त्या जिल्ह्यातील जिल्हा निबंधक, सहकारी संस्था यांना यापुढे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमणुकीचे आदेश काढलेले आहेत. त्याप्रमाणेच या बाजार समितीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा निबंधक, सहकारी संस्था, पुणे, (ग्रामीण) यांची नियुक्ती केली व या संदर्भातील पुढील कार्यवाहीचे अधिकार दिले आहेत. त्यांना नियमानुसारची सर्व पूर्तता करून, शासनाच्या निर्देशाप्रमाणे व कोर्टाच्या आदेशाप्रमाणे प्रक्रिया पार पाडावी लागेल.