कोरोनाच्या संकटात गावांना वाली कोण ?

चक्क एका अधिकाऱ्याकडे दहाहून जास्त गावांचा कारभार
शिक्रापूर: महाराष्ट्रासह पुणे जिल्ह्यात सध्या कोरोनाने थैमान घातले असताना कोरोना विषाणूचा सामना करण्याचे मोठे आव्हान स्थानिक ग्रामपंचायतींपुढे उभे आहे. त्यात पुणे जिल्ह्यात अनेक ग्रामविकास अधिकारी यांच्या बदल्याही झाल्या आहेत. शासनाने मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींचर प्रशासक नेमले मात्र प्रत्येक प्रशासकास दहा हून जास्त गावे दिल्याने प्रशासकाला प्रत्येक गावाला वेळ देणे शक्य होईल का असा प्रश्न उपस्थित होत असून कोरोनाच्या संकटात गावांना वाली कोण असणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.
-तब्बल ४१८ ग्रामपंचायतींची नुकतीच संपली मुदत
जिल्ह्यातील शिरूर, बारामती, खेड, मुळशी, इंदापूर, मावळ, दौंड, भोर, वेल्हे, जुनर या तालुक्यांतील तब्बल ४१८ ग्रामपंचायतींची नुकतीच मुदत संपली आहे. राज्य निवडणुक आयोगाच्या वेळापत्रकानुसार सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणुका घेणे शक्य नसल्याने शासनाने मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याचे अधिकार जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी दिले आहेत, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी २१ व २३ ऑगस्ट रोजी अध्यादेश काढून मुदत संपलेल्या ४१८ ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणुन प्रत्येक तालुक्यातील विस्तार अधिकाऱ्यांची नियुक्ती करुन नियुक्त केलेल्या प्रशासकाने नियुक्तीच्या ग्रामपंचायतीचा तत्काळ कार्यभार स्वीकारण्याचे आदेशही काढले आहे. शिरूर तालुक्यातील मुदत संपलेल्या ६७ ग्रामपंचायतीवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी विस्तार अधिकारी यांना प्रशासक नेमले आहे. मात्र मुदत संपलेल्या या शिरूर तालुक्यातील ६७ ग्रामपंचायतीवर तालुक्यातील सहा विस्तार अधिकाऱ्यांची नेमणूक केली असून सदर अधिकाऱ्यांनी तत्काळ कार्यभार स्वीकारण्याचे आदेश असुनही बहुतांश ग्रामपंचायतींचा कार्यभार अद्याप सदर विस्तार अधिकाऱ्यांनी घेतला नाही. कोरेगाव भीमा, सणसवाडी, शिक्रापूर, तळेगाव ढमढेरे, कारेगाव या ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असून अनेक ठिकाणी कोरोनाचे बळी गेले आहेत. मात्र सध्या मुदत संपलेल्या ग्रामपंचायतच्या कार्यकारिणी सभासद व पदाधिकारी हात झटकून मोकळे झाले आहे. तसेच अनेक ग्रामपंचायतींच्या ग्रामविकास अधिकाऱ्यांचीही बदली झाल्याने कोरोना बाबत प्रशासकीय पातळीवर निर्णय घेण्यात अडचणी येत आहेत. अनेक गावांमध्ये कंटेन्मेंट झोनची अंमलबजावणी होत नसल्याने व विकासाचा गाडा ठप्प झाल्याने जिल्हा परिषदेने एका प्रशासकास जास्तीत जास्त दोन गावे देवून ग्रामपंचायतींचा कार्यभार व कोरोनाची लढाई यशस्वी करण्यासाठी पाऊले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.
– प्रशासक कार्यभार स्वीकारणार :विजयसिंह नलावडे
शिरूर तालुक्यातील ६७ ग्रामपंचायतवर प्रशासक नेमण्यात आलेले आहेत. काही ग्रामपंचायतींचा कार्यभार प्रशासकांनी स्विकारला असुन उर्वरित सर्व ग्रामपंचायतींचा कार्यभार लवकरच प्रशासक म्हणून नेमण्यात आलेले सदर विस्तार अधिकारी स्वीकारतील, असे शिरुर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजयसिंह नलावडे यांनी सांगितले.