स्वतःच्या दोन महिन्यांच्या मुलीला ठार मारणारा नराधम बाप इंदापूर पोलीसांच्या कचाट्यात

इंदापूर : अवैध शस्त्रसाठा असल्याची माहिती मिळाल्यानंतर छापा टाकताना,स्वतःच्या दोन महिन्यांच्या मुलीला ठार मारणारा नराधम बाप इंदापूर पोलीसांच्या कचाट्यात सापडला. गुरुवारी (दि.१७) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास आबा करेवस्ती (ता.इंदापूर) येथे

इंदापूर : अवैध शस्त्रसाठा असल्याची माहिती मिळाल्यानंतर छापा टाकताना,स्वतःच्या दोन महिन्यांच्या मुलीला ठार मारणारा नराधम बाप इंदापूर पोलीसांच्या कचाट्यात सापडला. गुरुवारी (दि.१७) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास आबा करेवस्ती (ता.इंदापूर) येथे ही कारवाई झाली.

शक्ती उर्फ शक्तीमान उर्फ सकटया उर्फ चिटू विकास काळे, नितीन विकास काळे,अर्जुन विकास काळे,जितेंद्र भारत चव्हाण( सर्व रा.भांबूरे ता.कर्जत जि.अहमदनगर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.त्यांना दि.२३ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश इंदापूर न्यायालयाने दिला आहे.प्रमुख आरोपी शक्ती उर्फ शक्तीमान याच्यावर त्याच्या दोन महिन्यांच्या मुलीचा खून केल्याचा आरोप आहे.नितीन व अर्जुन हे दोन्ही आरोपी त्याचे सख्खे भाऊ आहेत.चव्हाण देखील नातलगच आहे.

वरकुटे बुद्रुक गावच्या हद्दीतील आबाकरेवस्तीवर ऊसतोड करणा-यांकडे अवैध शस्त्रसाठा असल्याची माहिती इंदापूर पोलीसांना मिळाली होती. त्यावरुन पोलीस अधिक्षक मिलींद मोहिते,उपविभागिय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर,पोलीस निरीक्षक नारायणराव सारंगकर यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव,पोलीस नाईक दीपक पालके,पोलीस कॉन्स्टेबल अमित चव्हाण,विनोद मोरे,प्रवीण शिंगाडे,विनोद काळे, जगदीश चौधर,गजेंद्र बिरलिंगे, विठ्ठल नलवडे,विकम जमादार यांनी गुरुवारी (दि.१८) रात्री आबा करेवस्तीवर छापा टाकला. त्यावेळी वरील आरोपींकडे तलवार,जांबिया व दोन कोयते अशी धारदार घातक हत्यारे मिळून आली.अधिक चौकशी करताना प्रमुख आरोपी शक्ती हा ऊसतोड कामगार म्हणून  करेवाडी येथील एकनाथ धोंडीबा करे यांच्या शेतामध्ये वास्तव्यास असताना दि.२३ नोव्हेंबर २०२० रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास आपली दोन महिन्यांच्या मुलीचा नाक तोंड दाबून खून करुन फरार झाल्याचे निष्पन्न झाले.या प्रकरणी घटना घडल्याच्या दिवशी त्याची पत्नी सोनम काळे (वय १८ वर्षेे,रा. भांबूरे) हिने इंदापूर पोलीसांकडे मयताची खबर दिली होती.काल रात्री तिने रीतसर फिर्याद दिली आहे.

नितीन विकास काळे याचेवर कर्जत पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींनी इंदापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आणखी काही गुन्हे केले आहेत का याबाबत पोलीस निरीक्षक सारंगकर यांचे मार्गदर्शनाखाली दीपक पालके व प्रमोद धंगेकर हे अधिक तपास करत आहेत.