नुकसानग्रस्तांना लवकरच सर्वोतपरी मदत करणार; गृहमंत्री वळसे-पाटील यांचे आश्वासन

    घोडेगाव : महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी आंबेगाव तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील आदिवासी भागात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा पाहणी केली. लवकरात लवकर शासन स्तरावर सर्वोतपरी मदत केली जाईल, असे आश्वासन दिले.

    सोबत पूर्वा वळसे-पाटील, बाजार समिती सभापती देवदत्त निकम, तहसीलदार रमा जोशी, पंचायत समिती सभापती संजय गवारी, सुभाष मोरमारे, नंदकुमार सोनावले, गणपतराव कोकणे तसेच शासकीय अधिकारी वर्ग व कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

    आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम भागात मागील आठववड्यात मुसळधार पाऊस झाल्याने ओढ्या-नाल्यांना पूर आला होता व भातशेतीचे मोठे नुकसान झाले होते. भीमाशंकरकडे जाणाऱ्या पोखरी घाटात अतिवृष्टीमुळे अनेक ठिकानी दरडी कोसळल्या होत्या. त्यामुळे भीमाशंकर परिसरातील वाहतुकीवर परिणाम झाला होता. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी आदेश दिल्यामुळे प्रशासनातील अधिकार्‍यांनी आदिवासी भागात थांबून रस्ते दुरुस्ती व वाहतूक पूर्ववत करण्यासाठी काम केले होते.

    आज सोमवारी उगलेवाडी, संगमवाडी गोहे खुर्द, गो बुद्रुक, तळेघर, कोंढवळ, निगडाळे, भिमाशंकर, राजपुर, चिखली, जांभोरी, फलोदे, कुशिरे, माळीण, आहुपे, पिंपरगणे, तिरपाड, आसाणे, बोरघर या अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त भागात वळसे पाटील यांनी भेट दिली असून, तिथल्या भातशेतीचे, तसेच पावसाचे पाणी शिरलेल्या लोकवस्तीमध्ये जाऊन पाहणी केली आहे.