आरक्षणचा प्रश्न विधानसभेत मांडू; आमदार राहुल कुल यांचे आश्वासन

    पाटस : भारतीय जनता पार्टीने ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षण प्रश्नावर राज्यभर चक्काजाम आंदोलन करण्याची घोषणा केली होती. मात्र, दौंड भाजपचे आमदार राहुल कुल यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी (दि.२६) पाटस येथील टोल नाक्यावर चक्काजाम आंदोलनाऐवजी धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलानात आमदार राहुल कुल यांनी मराठा आरक्षण, ओबीसी समाजाचे आरक्षण आणि मागासवर्गीय समाजाचे पदोन्नती आरक्षणाबाबत आगामी अधिवेशानात भक्कमपणे बाजू मांडून सरकराला जाब विचारू, असे आश्वासन दिले.

    सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी समाजाचे स्थानिक स्वराज संस्थेतील राजकीय आरक्षण रद्द करण्याचा निर्णय काही दिवासांपूर्वी दिला होता. या निर्णयानंतर ओबीसी समाजात तीव्र संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. भाजपच्या माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेत्या पंकजा मुंडे यांनी आघाडी सरकार विरोधात राज्यव्यापी चक्काजाम आंदोलनाची हक्क दिली होती. त्यानुसार शनिवारी पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पाटस येथील टोल वसूली नाक्यावर दौंड भाजपच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्याचे नियोजन करण्यात आले होते. सकाळपासूनच तालुक्यातील भाजप कार्यकर्ते टोलनाका परिसरात जमा झाले. मात्र, याठिकाणी चक्काजाम आंदोलनाऐवजी रस्तालगत बसून धरणे आंदोलन करण्यात आले.

    यावेळी आमदार कुल म्हणाले, सरकारच्या नाकार्तेपणामुळे मराठा समाजाचे आरक्षण न्यायालयात रद्द झाले. ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षणही न्यायालयाने रद्द केले. असे असतानाच मागासवर्गीय समाजाचे पदोनत्तीमधील आरक्षण या सरकारने रद्द केले. न्यायलायात आरक्षणाची बाजू सरकाराने मांडली नाही. हे सरकार सर्व सामान्यांचे प्रश्न सोडविण्यात अपयशी ठरले आहे. येत्या दोन दिवसाच्या अधिवेशानाच्या कालावधीत आरक्षणचा प्रश्न आक्रमकपणे मांडणार आहे. मराठा समाज, ओबीसी समाज आणि मागासवर्गीय समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन आमदार कुल यांनी दिले.

    राष्ट्रवादीतील ओबीसी नेते काका-पुतण्याच्या ताटाखालचे मांजर

    भाजप किसान मोर्चाचे प्रदेशध्यक्ष वासुदेव काळे म्हणाले, की शाहु, फुले आंबेडकर यांचे नाव घेणारे हे सरकार जातीवादी आहे. मराठा समाज,ओबीसी समाजाच्या भावनेशी खेळत आहे. ओबीसी समाजाचे आणि मागासवर्गीय समाजाचे आरक्षण संपविले आहे. असे असतानाही राष्ट्रवादी मधील ओबीसी नेते हे काका पुतण्याच्या दावणीला बांधले असून, ताटाखालची मांजरे झाली आहेत, अशी टीका काळे यांनी नाव न घेता ओबीसी नेत्यांवर यावेळी केली.