सोलापूरचे पालकमंत्री बदलणार का?; जयंत पाटलांनी दिलं ‘हे’ स्पष्टीकरण

दत्तात्रय भरणे हेच सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून कायम राहतील, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी स्पष्ट केलंय. सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी शरद पवार यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, जिल्ह्याचे पालकमंत्री बदलण्याची मागणी झालेली नाही, असं जयंत पाटील यांनी सांगितलं. ते पुण्यात बोलत होते.

  पुणे : उजनी धरणाऱ्या पाण्यावरुन निर्माण झालेल्या वादानंतर सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री बदलण्याची चर्चा जोर धरु लागली होती. मात्र दत्तात्रय भरणे हेच सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून कायम राहतील, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी स्पष्ट केलंय.

  सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी शरद पवार यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, जिल्ह्याचे पालकमंत्री बदलण्याची मागणी झालेली नाही, असं जयंत पाटील यांनी सांगितलं. ते पुण्यात बोलत होते.

  दरम्यान दुसरीकडे आजची बैठक ही सोलापूर जिल्ह्यात पक्षवाढीसाठी काय करायला हवं यासाठी होती. उजनीच्या पाण्याचा वाद मागेच संपला आहे. आजच्या बैठकीत सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाबाबत कुठलीही चर्चा झाली नसल्याचं स्वत: दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं. सोलापूरच्या उजनी धरणातील 5 टीएमसी पाणी इंदापूरला वळवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. उजनीतून पाणी उचलून इंदापुरात नेण्यासाठी लाकडी निंबोळी योजनेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंजुरी दिली आहे.

  पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्तक्षेपामुळेच हे पाणी वळवण्यात आल्याचं सांगितलं जात होतं. त्याला सोलापूरकरांनी विरोध केला होता. त्यानंतर सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री बदलण्याची चर्चा सुरु झाली होती.

  जयंत पाटलांकडून तो निर्णय रद्द

  उजनी घरणातील 5 टीएमसी पाणी इंदापूरला वळवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. राज्य सरकारच्या या निर्णयाला सोलापूरकरांकडून मोठा विरोध करण्यात आला. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याविरोधात सोलापुरात जोरदार आंदोलनंही करण्यात आली. वाद पेटत असल्याचं लक्षात आल्यानंतर जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी उजनी धरणातील पाणी इंदापूरला वळवण्याचा निर्णय रद्द केल्याचं 19 मे रोजी जाहीर केलं होतं.