corona

इंदापूर  :   पुढील काळात पूर्णवेळ देऊन तालुक्यातील कोरोना रुग्णांवर उपचार करत माझे कर्तव्य पार पाडण्याचा संकल्प मुंबईवरुन येतानाच आपण केला आहे.तो निश्चितपणे तडीस नेला जाईल,अशी ग्वाही कोरोनावर मात केल्यानंतर इंदापूरला परतलेले प्रख्यात ह्रदयरोग तज्ज्ञ डॉ.अविनाश पाणबुडे यांनी मंगळवारी (दि.२३ सप्टेंबर) पत्रकारांशी बोलताना दिली.

एम.डी.मेडिसीनची पदवी घेतल्यानंतर सन १९९८ पासून डॉ.पाणबुडे शहरात रुग्णसेवा करत आहेत.ऐन घटकेला जोखीम पत्करुन रुग्णास बरे करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याच्या त्या कार्यपध्दतीमुळे इंदापूर व परिजिल्ह्यातील अनेक तालुक्यातील असंख्य लोक त्यांच्याकडे हक्काचा डाॅक्टर म्हणून पहात आहेत.   या पार्श्वभूमीवर रुग्ण सेवा करताना त्यांना कोरोनाची लागण झाली.कोरोना झाल्यानंतर सामान्य लोकांना बेड, रूग्णवाहिका याबद्दल जे कटू अनुभव येतात तेच डॉक्टरांना आले.पुण्यात काहीकाळ त्यानंतर मुंबईत उपचार झाल्यानंतर त्यांनी खंबीर मानसिकतेद्वारे दि.२१ सप्टेंबर रोजी त्यांनी कोरोनावर मात केली.   दि.२१ सप्टेंबरच्या पहाटे माजी उपनगराध्यक्ष अरविंद वाघ यांनी त्यांच्या राधिका सेवा संस्थेची अद्ययावत रुग्णवाहिका डॉक्टरांना आणण्यासाठी मुंबईला पाठवली.सायंकाळी आठच्या दरम्यान डाॅक्टर वनगळी येथील ‘हाॅटेल निसर्ग’ जवळ पोहोचले. अस्थिरोग तज्ज्ञ डॉ.बाळासाहेब राऊत यांच्यासह डॉ.पाणबुडे यांचे वैद्यकीय क्षेत्रातील सहकारी मित्र तेथे स्वागतासाठी थांबले होते. पुष्पवर्षावाने य्यांचे स्वागत झाले. इंदापूरात अरविंद वाघ व त्यांच्या मित्र परिवाराने जंगी स्वागत केले. राधिका गणेश मंडळाने तोफांची सलामी दिली.