गृहमंत्री वळसे-पाटील यांची मोठी घोषणा; ‘बैलगाडा मालकांवरील गुन्हे मागे घेणार’

राज्यात बैलगाडा शर्यतींना बंदी असतानाही सांगलीत आमदार गोपीचंद पडळकर व भाजप नेतृत्वाखाली बैलगाडा शर्यती झाल्या. त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.

  मंचर : बैलगाडा मालकांवर आजवर दाखल झालेले गुन्हे लवकरच मागे घेण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे गृहमंत्री (Home Minister) दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी आज मंचर पुणे येथे उपजिल्हा रुग्णालयाच्या कार्यक्रमात केली. हे गुन्हे मागे घेणार म्हणून आगामी काळात कोणीही कायदा हातात घेऊन बैलगाडा शर्यती भरवू नये, अशा सूचनाही वळसे पाटलांनी केल्या.

  मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या विविध उद्घाटन कार्यक्रमात गृहमंत्री वळसे-पाटील बोलत होते. या कार्यक्रमास एकमेकांचे विरोधक असलेले वळसे पाटील आणि शिवसेनेचे उपनेते व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील एकत्र आले होते.

  बैलगाडा शर्यत बंदीविरोधात भाजप आक्रमक झाला आहे. अशातच बैलगाडा शर्यत बंदीच्या विरोधात शिवाजीराव आढळराव पाटील यांनीही गृहमंत्र्यांच्याच मतदारसंघात म्हणजे आंबेगाव तालुक्यात पुढील पंधरा दिवसांत बैलगाडा शर्यती भरविण्याची घोषणा केली होती. परंतु राजकीय मतभेद बाजूला ठेवून वळसे-पाटील आणि आढळराव-पाटील एकत्र आले नाही, तर बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठणार नाही, असे आढळराव पाटील म्हणाले.

  त्यानंतर वळसे पाटील म्हणाले की, राज्यात बैलगाडा शर्यतींना बंदी असतानाही सांगलीत आमदार गोपीचंद पडळकर व भाजप नेतृत्वाखाली बैलगाडा शर्यती झाल्या. त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. बैलगाडा शर्यतबंदीचा विषय हा पाच न्यायाधीशांच्या खंडापीठपुढे निर्णयासाठी आहे. केंद्र व राज्य सरकार दोघेही बैलगाडा शर्यती सुरु होण्यासाठी सकारात्मक आहेत. त्यामुळे आंदोलनाची दखल न्यायालय घेणार नाही. पुढील काळात बैलगाडा शर्यती सुरु करण्यासाठी सर्वपक्षीय प्रयत्न करण्यात येतील.

  बैलगाडा शर्यत बंदीविरोधात राजकारण करण्याची कोणाचीही भूमिका नाही. त्या सुरू व्हाव्यात, यासाठी सर्वपक्षांचा पाठिंबा आहे. बैलगाडा शर्यतीच्या मर्यादा पाळून शर्यतीस परवानगी दिली होती. मात्र, बैलगाडा मालक त्याचे पालन करत नाहीत, त्यामुळे शर्यतींवर पुन्हा बंदी आली. सध्या हा प्रश्न पाच न्यायाधीशांच्या खंडपीठापुढे आहे. ते जोपर्यंत या प्रश्नावर निकाल देणार नाहीत, तोपर्यत शर्यतींवरील बंदी उठणार नाही.

  आढळराव पाटील यांच्या एकत्र येण्याच्या आवाहनाबाबत वळसे पाटील म्हणाले की, एकत्र यायला काही नाही. मात्र, कोरोनाच्या नियमांमुळे गर्दी करायला नको. शेवटी आयोजकांवर गुन्हा दाखल होतो. आताही पाहा ना किती गर्दी झालीय. आजपर्यत बैलगाडा मालकांवर दाखल झालेले गुन्हे लवकरच मागे घेण्यात येतील. मात्र, गुन्हे मागे घेणार म्हणून लगेच शर्यती भरवू नका, असे आवाहनही वळसे पाटील यांनी केले.