honey trap

दोन महिलांसह चौघांना अटक,बडतर्फ पोलिसाचा समावेश

    बारामती : महिलादिनी शहर पोलीस ठाण्याचा ‘चार्ज’ मिळालेल्या महिला पोलीस अधिका-यांनी ‘हनी ट्रॅप’ चा सापळा लावुन लाखोंची खंडणी मागणारी टोळी जेरबंद केली आहे.

    राकेश रमेश निंबोरे (वय २४,रा.साखरवाडी,ता.फलण,जि.सातारा), स्मिता दिलीप गायकवाड (वय २३,रा.फलटण,जि.सातारा),आशिष अशोक पवार (वय २७, रा.भुर्इंज, ता.वाई, जि.सातारा),सुहासिनी अशोक अहिवळे (वय २६, रा.मंगळवार पेठ ,फलटण,जि.सातारा) या चौघाजणांना अटक केली आहे.याबाबत ४५ वर्षीय व्यापा-याने फिर्याद दिली आहे.

    बारामती शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की,आरोपी स्मिता हिने मोबाईल फोनवरुन फिर्यादी यांच्याशी ओळख निर्माण केली. तसेच २७ फेब्रुवारी रोजी फिर्यादीला फलटण येथे बोलावून घेतले. तिच्या फ्लॅटवर तिची अनोळखीची मैत्रीण आणि आशिष पवार, राकेश निंबोरे(गुरु काकडे) यांनी फिर्यादीला महिला अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्याची भीती दाखवली.तसेच ५ लाख रुपये खंडणीची मागणी केली. त्यानंतर फिर्यादीकडे १ लाख रुपये घेवुन आणखी ४ लाख रुपये बारामतीत घेण्यास येत असल्याचे त्यास सांगितले.
    त्यावर घाबरलेल्या फिर्यादीने शहर पोलीस ठाणे गाठले.त्या दिवशी महिला दिनी महिला पोलीस अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक आश्वीनी शेंडगे याच्याकडे पोलीस ठाण्याचा ‘चार्ज’ होता.त्यांनी फिर्यादीच्या तक्रारीची दखल घेत पोलीस पथक तयार केले.या पथकाने सापळा रचत बारामती बसस्थानकात आरोपी निंबोरे यास सिनेस्टाईलने पाठलाग करीत पकडले.त्याच्याकडे केलेल्या चौकशीत इतर आरोपींची नावे निष्पन्न झाली.आरोपी पवार हा बडतर्फ पोलीस आहे.तो कुरार (बृहन्मुंबई) येथील पोलीस ठाण्यात होता.तर निंबोरे हा सराईत गुन्हेगार असुन त्याच्यावर लोणंद,फलटण पोलीस ठाण्यात एकुण ११ गुन्हे दाखल आहेत.अधिक तपास पोलिस निरीक्षक नामदेव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती शहर पोलिस करत आहेत.