children infected with corona

राज्यासह पिंपरी - चिंचवडमध्ये कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर दुसऱ्या लाटेने धुमाकूळ घातला. पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत लहान मुले कोरोना बाधित होण्याचे प्रकार अधिक समोर आले. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये या वर्षी लहान मुलांच्या रुग्णसंख्येत वाढ झालेली दिसून आली, तर संभावित तिसऱ्या लाटेत लहान मुलांना सर्वाधिक जपण्याचे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.

  पिंपरी: कोरोनाची दुसरी लाटा ओसरल्यानंतर राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. मात्र दुसरीकडे वैद्यकीय तज्ज्ञानी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची वर्तवलेली शक्यता लक्षात घेऊन त्यादृष्टीने योग्य पावले उचलण्यास सरकारने सुरुवात केली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका लहानमुलांना बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. लहान मुलांच्या उपचारासाठी वैद्यकीय साहित्याची जुळवाजुळव महापालिकेने सुरु केली आहे. महापालिकेच्या विविध रुग्णालयात लहान मुलांसाठी ६६ व्हेंटिलेटर उपलब्ध असून १३८ आयसीयू खाटा सज्ज आहेत. सध्या महापालिकेकडे १६ बालरोग तज्ज्ञ कार्यरत असून वाढीव खाटांसाठी डॉक्टर आणि परिचारीकांची आवश्यकता भासत आहे.

  राज्यासह पिंपरी – चिंचवडमध्ये कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर दुसऱ्या लाटेने धुमाकूळ घातला. पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत लहान मुले कोरोना बाधित होण्याचे प्रकार अधिक समोर आले. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये या वर्षी लहान मुलांच्या रुग्णसंख्येत वाढ झालेली दिसून आली, तर संभावित तिसऱ्या लाटेत लहान मुलांना सर्वाधिक जपण्याचे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.तिसऱ्या लाटेपूर्वीच बळकट आरोग्य यंत्रणा उभारण्याचे काम सुरू असून वैद्यकीय साहित्यासह औषधोपचाराच्या दृष्टीने स्वयंपूर्ण होण्याचा प्रयत्न महापालिका यंत्रणा करत आहेत.

  महापालिकेचे सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ.लक्ष्मण गोफणे म्हणाले, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील २०० खाटा (३० खाटा अतिदक्षता विभाग), जिजामाता रुग्णालयात १०० खाटा (१० अतिदक्षता विभाग) आणि घरकुल इमारतीत ८०० खाटांचे कोरोना काळजी केंद्र कार्यान्वित करण्यात येणार आहे. याखेरिज, सुमारे २२ बालरुग्णालये शहरात आहेत. त्यांनाही तिसऱ्या लाटेबाबत अवगत करण्यात आले आहे. प्रसंगी त्यांच्या खाटाही अधिग्रहीत केल्या जातील. मनुष्यबळाची कमतरता भासणार नाही. परिचारिकांना प्रशिक्षण देण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

  लहान मुलांसाठी ६६ व्हेंटिलेटर

  हजारो रुग्णांसाठी आशादायी ठरत असलेल्या महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात लहान मुलांसाठी आवश्यक असलेल्या व्हेंटिलेटरचा तुटवडा असल्याची बाब समोर आली आहे. या रुग्णालयात लहान मुलांसाठी अत्यल्प व्हेंटिलेटर उपलब्ध असल्याने अतिजोखमेच्या स्थितीत जीव वाचवण्यात आवश्यक असलेल्या या वैद्यकीय उपकरणाची संख्या वाढवण्याचे आव्हान आरोग्य यंत्रणेसमोर आहे.

  केवळ ४ बालरोगतज्ज्ञ कार्यरत

  लहान मुलांवर उपचार करण्यासाठी केवळ चारच बालरोग विशेषतज्ज्ञ कार्यरत आहेत. आणखी सात सहयोगी प्राध्यापकांची आवश्यकता असल्यानंतर सुद्धा केवळ एकच सहयोगी प्राध्यापक कार्यरत आहेत. चार सहाय्यक प्राध्यापकांची गरज असल्यानंतर सुद्धा केवळ दोनच जबाबदारी सांभाळत आहेत. त्यामुळे अपुऱ्या मनुष्यबळाची समस्या या ठिकाणी असल्याने तिसऱ्या लाटेत लहानग्यांना वाचवण्यासाठी मनुष्यबळीची कमतरता भरुन काढावी लागणार आहे.

  मदतीसाठी हव्यात नर्स
  लहान मुलांसाठी अतिदक्षता विभाग, नवजात शिशू विभागासह कोरोनाने बाधित बालकांसाठी नर्सची आवश्यकता भविष्यात भासणार आहे. हे मनुष्यबळ अद्याप येथे उपलब्ध नसल्याने लहान मुलांवर उपचार करताना अडचणी निर्माण होतील.उपलब्ध मनुष्यबळ प्रशिक्षित असणे गरजेचे आहे.