सरकारी कार्यालयात लाच दिल्याशिवाय कामे होत नाही; बाळा भेगडेंचा गंभीर आरोप

  वडगाव मावळ : मावळ तालुक्यात लाचखोरीचे सत्र सुरूच असून गेल्या वर्षात आठ शासकीय अधिकाऱ्यांना लाचलुचपत विभागाने अटक केली. या लाचखोर अधिकाऱ्यांना जिल्ह्याचे पालकमंत्री व मावळचे लोकप्रतिनिधी मावळातून शासकीय अधिकाऱ्यांना वसुलीचे टार्गेट दिले आहे का? असा आरोप माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी गुरुवारी (दि. ३) वडगाव मावळ पंचायत समिती येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केला.

  पत्रकार परिषदेस भाजपचे तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे, प्रभारी भास्कर अप्पा म्हाळसकर, मावळच्या सभापती निकिता घोटकुले, माजी सभापती गुलाब म्हाळसकर, माजी उपसभापती शांताराम कदम, माजी तालुका अध्यक्ष अध्यक्ष प्रशांत ढोरे, युवा मोर्चा अध्यक्ष संदीप काकडे, तालुका सरचिटणीस सुनिल चव्हाण, पंचायत समिती सदस्या ज्योती शिंदे, सुवर्णा कुंभार, अलका धानिवले, नगरसेवक किरण म्हाळसकर, दिनेश ढोरे व नगरसेविका अर्चना म्हाळसकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

  एजंट-दलाल यांचा घ्यावा लागताे आधार

  भेगडे म्हणाले, नागरिकांना आपल्या कामासाठी कार्यालयामध्ये नेमलेल्या एजंट- दलाल यांचा आधार घ्यावा लागतो. हेलपाटे मारावे लागतात. लाच द्यावी लागते. लाचखोरीच्या घटना आणि अधिकाऱ्यांना दिलेल्या टार्गेटमुळे मावळच्या जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणावर होणारी गुंतवणूक, येणारे नवीन उद्योग, वाढणारे नागरीकरण यावर याचा दुरगामी परिणाम होणार अाहे. फसवणूक, खोटे जमीन व्यवहार, गुन्हेगारीकरण, कंपन्यांमध्ये होणारे दबावतंत्र, काम मिळविण्यासाठी खोटेनाटे दबावाचे राजकारण यामुळे तालुक्यातील सर्वच वातावरण अशांत झाल्याचे भगडे यांनी सांगितले.

  मावळ तालुक्यातील प्रशासनावर कोणाचाच धाक व अंकुश नसल्याने काही अधिकारी संगनमत करुन मोठमोठ्या आर्थिक उलाढाली करीत आहेत. सरकारी कार्यालयामध्ये भ्रष्टाचार आणि लाच दिल्याशिवाय कोणतेही काम होत नाही. आगामी काळात भाजपचे कार्यकर्ते प्रत्येक शासकीय कार्यालयातील लाचखोरी रोखण्यासाठी जागृत राहणार आहेत.

  – बाळा भेगडे, माजी राज्यमंत्री