चिंताजनक! ॲक्टिव्ह कोरोना रुग्णसंख्येत पुण्याने २०० देशांनाही टाकले मागे ; पुण्यात गेल्या २४ तासांत देशातील सर्वाधिक कोरोना रुग्णांची नोंद

कोरोना रूग्णांची संख्या दर्शविणार्‍या वर्ल्डोमीटर या वेबसाइटनुसार, गेल्या २४ तासात पुण्यात ॲक्टिव्ह रूग्णांची संख्या जगातील २०० देशांमध्येही एकाच वेळी आढळली नाही.

    पुणे : महाराष्ट्रात कोरोनाचा फैलाव वेगाने होत आहे. राज्यातील कोरोनाचा पहिल्या रुग्ण पुण्यात आढळून आल्यानंतरची सर्वाधिक रुग्णवाढ काल बुधवारी नोंदविली गेली.पुणे शहरात २ हजार ५८७ रुग्ण आढळले. तर पुणे जिल्ह्यात काल दिवसभरात तब्बल ४७४५ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे तर पंधरा रुग्णांचा मृत्यू झालाय. ही आतापर्यंत पुणे जिल्ह्यात एका दिवसात आढळून आलेली दुसऱ्या क्रमांकाची रुग्णांची संख्या आहे.

    पुण्याने २०० देशांनाही टाकले मागे
    कोरोना रूग्णांची संख्या दर्शविणार्‍या वर्ल्डोमीटर या वेबसाइटनुसार, गेल्या २४ तासात पुण्यात ॲक्टिव्ह रूग्णांची संख्या जगातील २०० देशांमध्येही एकाच वेळी आढळली नाही. फिलीपिन्स, बल्गारी, ग्रीस, हंगेरी, कॅनडा, ऑस्ट्रिया, पाकिस्तान, युएई, बांग्लादेश, स्वित्झर्लंड, दक्षिण आफ्रिका, कुवैत, मेक्सिको, मलेशिया, नॉर्वे आणि जपान या मोठ्या देशांचा या देशांमध्ये समावेश आहे.

    दरम्यान शहरातील आॅक्टोबरनंतरची कोरोना रुग्णांची संख्या फेब्रुवारी महिन्यात वाढण्यास सुरुवात झाली आहे. नव्या रुग्णांची दिवसाला १५०० च्या पुढे वाढते आहे. त्यामुळे रुग्ण दुप्पट होण्याचे प्रमाणही वाढले आहे. शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण ९ मार्च रोजी आढळून आल्यानंतर रुग्ण वाढत गेले. जून-जुलैमध्ये हे प्रमाण वाढले होते. गणेशोत्सवानंतर मात्र दिवसाकाठी दोन हजारांपर्यंत रुग्ण वाढ होत होती. या काळात रुग्णवाढीचा वेग वाढला होता. १६ सप्टेंबर २०२० रोजी सर्वाधिक २ हजार १२० रुग्णांची वाढ नोंदविण्यात आली होती.