महाळुंगे पडवळ येथे श्रावणी बैलपोळ्यानिमित्त भरणारी यात्रा रद्द

मंचर :  महाळुंगे पडवळ (ता.आंबेगाव) येथे मंगळवार (दि.१८) ते गुरुवार या दरम्यान श्रावणी बैलपोळ्यानिमित्त पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी भरणारी यात्रा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली आहे, अशी माहिती यात्रा समितीच्यावतीने देण्यात आली. महाळूंगे पडवळ येथे होणारा श्रावणी बैलपोळा यात्रा उत्सव मोठ्या दिमाखात आणि उत्साहात साजरा करण्यात येत असतो. यात्रा कालावधीच्या तीन दिवसात सुमारे ८० हजार नागरिक येथील यात्रेला भेट देत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.मंगळवार ते गुरुवार या कालावधीत श्रावणी बैलपोळा उत्सव यात्रा होणार होती. परंतु कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यात्रा रद्द करण्यात आली आहे.ग्रामपंचायत,ग्रामस्थ व यात्रा कमिटी यांची संयुक्त बैठक घेऊन सर्वानुमते यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

बैलांची आकर्षक मिरवणूक, कुस्त्यांचा जंगी आखाडा,काठी मिरवणूक, संगीत, भजन व लोकनाट्याचे कार्यक्रम होणार नाहीत, अशी माहिती यात्रा कमिटीच्यावतीने देण्यात आली आहे. पुणे,नगर जिल्ह्यातील नामवंत पैलवान या यात्रेसाठी हजेरी लावतात.तरी या सर्व पैलवानांनी यात्रा रद्द झाली असल्याची नोंद घेणे गरजेचे आहे. यात्रा कालावधीत काही अनुचित प्रकार घडल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. असा इशारा मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे व पोलिस जवान अजित मडके यांनी दिला आहे. ग्रामस्थ व नागरिकांनी काटेकोरपणे  निर्णयाची अंमलबजावणी करावी, असे आवाहन ग्रामपंचायतीच्यावतीने करण्यात आले आहे.