कोरोना प्रतिबंधक लस घेण्यापूर्वी तरुणांनी रक्तदान करण्यासाठी पुढे यावे; विलास लांडे यांचे आवाहन

    पिंपरी : राज्य सरकारने 18 वर्षापुढील सर्वांनाच लस देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर शहरात सध्या रक्ताचा तुटवडा भासत आहे. कोरोना प्रतिबंधक लस टोचून घेतल्यानंतर किमान 28 दिवस रक्तदान करता येत नसल्याचे राज्य रक्त संक्रमण परिषदेने यापूर्वीच जाहीर केले आहे. लसीचा डोस घेण्यापूर्वी जास्तीतजास्त नागरिकांनी रक्तदान करावे. कोविड काळात रक्ताची टंचाई भासणार नाही, असे आवाहन माजी आमदार विलास लांडे यांनी केले आहे.

    कोरोनाचा प्रदुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने 1 एप्रिलपासून 45 वर्षांवरील वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात केली. आता लसीची उपलब्धता वाढवून 18 वर्षापुढील सर्वांना लस देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र, रक्तपेढीच्या अधिकाऱ्यांनी रक्ताच्या तुटवड्याबाबत चिंता व्यक्त केली आहे. राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या माहितीनुसार कोरोना लशीची शेवटची मात्रा घेतल्यानंतर पुढील २८ दिवसांपर्यंत लाभार्थी व्यक्ती रक्तदान करू शकत नाही. त्यामुळे लस घेतल्यानंतर रक्तदान करण्याकडे कल कमी होणार आहे. राज्यात रक्ताचा तुटवडा भासण्याची शक्‍यता परिषदेचे संचालक डॉ. अरुण थोरात यांनी यापूर्वीच व्यक्त केली आहे. ही वेळ पिंपरी-चिंचवडकरांवर येऊ नये, यासाठी आपण काळजी घेणे गरजेचे आहे, असेही माजी आमदार लांडे यांनी म्हटले आहे.

    एप्रिल, मे आणि जून या उन्हाळ्याच्या तीन महिन्यांत रक्ताचा तुटवडा भासतो. लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर रुग्णालयांमधून रक्ताची मागणी वाढली आहे. आता रुग्णालयांमध्ये कोव्हिड आणि नॉन-कोव्हिड अशा दोन्ही रुग्णांवर उपचार केले जात आहेत. त्यामुळे अधिकाधिक रक्तदात्यांची आवश्‍यकता भासत आहे. त्यातच कोरोना लस घेतल्यावर २८ दिवसांपर्यंत रक्तदान करता येणार नाही. त्यामुळे आधी रक्तदान करा आणि त्यानंतर कोरोनाची प्रतिबंधात्मक लस घ्यावी. शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी रक्तदान करण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन माजी आमदार लांडे यांनी केले आहे.