तुमच्या कार्यक्रमांना गर्दी चालते, मग गणेशोत्सवालाच गर्दी का नको, राज ठाकरेंची सरकारवर टीका

महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातील आठ मतदारसंघात पदाधिकारी आणि शाखाध्यक्षांशी संवाद साधला त्यापूर्वी त्यांनी माध्यमांशी बोलताना राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना सवाल केला की, तुमच्या राजकीय पक्षांच्या कार्यक्रमांना गर्दी चालते. फक्त दहीहंडी आणि गणेशोत्सवालाच गर्दी नको, ही कोणती पद्धत? असं राज ठाकरे म्हणाले.

    पुणे : महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातील आठ मतदारसंघात पदाधिकारी आणि शाखाध्यक्षांशी संवाद साधला त्यापूर्वी त्यांनी माध्यमांशी बोलताना राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना सवाल केला की, तुमच्या राजकीय पक्षांच्या कार्यक्रमांना गर्दी चालते. फक्त दहीहंडी आणि गणेशोत्सवालाच गर्दी नको, ही कोणती पद्धत? असं राज ठाकरे म्हणाले.

    गणेशोत्सव मंडळांशी चर्चा करून ठरवू

    कोविड-19 निर्बंधावरून ठाकरे सरकार विरोधात वक्तव्य करताना राज ठाकरे म्हणाले की, सरकारचे त्या त्या पक्षाचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. तिकडे गर्दी चालते. नियम असेल तर तो सर्वांना सारखा हवा. तुमच्या पक्षांच्या कार्यक्रमाला गर्दी चालणार. फक्त गणेशोत्सवाला नको. ही कोणती पद्धत?, असे सवाल विचारत त्यांनी सांगितले की, गणेशोत्सव कसा साजरा करायचा हे मंडळांना ठरवू द्या, गणेशोत्सव मंडळांशी चर्चा करून ठरवू, असेही राज ठाकरे म्हणाले.

    मनात आणले तर इम्पिरिकल डेटा शक्य

    नुसता ओबीसींचा विषय पुढे करून सरकार काही साध्य करतेय असे नको. पण जनगणना वगैरे झाल्यावर निवडणुका घ्यायला काही हरकत नाही, असे राज म्हणाले. सरकारकडे यंत्रणा आहे. त्यामुळे मनात आणले इम्पिरिकल डेटा किंवा जनगणना हे सर्व होऊ शकते. ती काही कठीण गोष्ट आहे असे वाटत नाही, असेही ते म्हणाले.

    सरकारच महापालिका चालवणार असे नको

    निवडणुका स्थगित ठेवल्या पाहिजे. पण काम पटकन होणार असेल तर स्थगिती मान्य आहे. सरकारच्या फायद्याचे असेल म्हणून आता निवडणुका घेतल्या जात नसतील. यात काही काळेबेरे असेल तर तेही समजून घ्यायला पाहिजे. सरकारलाच या निवडणुका नको आहेत आता. कारण नंतर सरकारच महापालिका चालवणार. कारण त्यावर प्रशासक नेमणार आणि सरकारच सर्व काम बघणार. हे सर्व उद्योगधंदे सरकारचे चालू आहेत. नुसता ओबीसींचा विषय पुढे करून सरकार काही साध्य करतेय असे नको असे ते म्हणाले.

    लॉकडाऊन आवडे सरकारला तेच खरे

    ते म्हणाले की, लॉकडावून आवडे सरकारला हे मी म्हणालो तेच खरे आहे. या निर्बंधामुळे जे चालले ते बरे चालले आहे असे सर्व सरकारला वाटते. आंदोलने नाही, मोर्चे नाही, सरकारच्या विरोधात कोणी बोलायचे नाही, रस्त्यावर कुणी उतरायचे नाही. काही झंझटच नाही. आपले आपले पैसे कमवा, आपली आपली दुकाने चालवा. बरे चालले सरकारांचे. केवळ कोरोनाची भीती दाखवली जात आहे. तिसरी चौथ्या लाटेची भीती दाखवली जात आहे. भीती दाखवून सरकार सर्व करत असेल तर हे कुठपर्यंत चालणार?, असा सवालही त्यांनी केला.

    लसीकरण झाल्यावरच शाळा उघडा

    यावेळी त्यांनी शाळा सुरू करण्याबाबतही प्रतिक्रिया व्यक्त केली. मुलांचे लसीकरण झाले नाही. पुनावालांचेही म्हणणे हेच आहे. पण लसीकरण पूर्ण झाले नसेल तर शाळा कशा उघडणार? लसीकरण झाल्यावरच शाळा उघडा, असेही ते म्हणाले.