बनावट वेबसाईटद्वारे तरुणाची १५ लाखांची फसवणूक

आरोपींनी संगणक साधनसामग्रीचा वापर करून खोटी वेबसाईट तयार केली. ती खरी असल्याचे भासवून त्याद्वारे फिर्यादी गराडे यांना रक्कम भरण्यास प्रवृत्त केले.

    पिंपरी: आर्थिक गुंतवणूक केल्यास ९० दिवसात जास्त रेफरल बोनस मिळण्याचे आमिष दाखवून तरूणाची १५ लाखांची फसवणूक केली. हा प्रकार काळेवाडी येथे घडला. याप्रकरणी चिनी व्यक्तीसह चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    संतोष बाळू गराडे (वय ३०, विजयनगर, काळेवाडी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. उदय प्रताप, राजेश शर्मा (दोघे , गुडगाव), निलेश कुमार कोठारी (द्वारका) आणि एका चिनी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार १६ डिसेंबर २०२० पासून १४ ऑगस्ट २०१९ या कालावधीत घडला.

    फिर्यादी गराडे यांना आरोपींनी वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरून व्हाट्सअपद्वारे संपर्क करून ई-बाईक सायकलच्या सहा योजनांमध्ये १० हजार रुपये भरल्यास ९० दिवसात ५ लाख ८५ हजार रुपये मिळतील असे जास्त रेफरल बोनसचे आमिष दाखवले. आरोपींनी संगणक साधनसामग्रीचा वापर करून खोटी वेबसाईट तयार केली. ती खरी असल्याचे भासवून त्याद्वारे फिर्यादी गराडे यांना रक्कम भरण्यास प्रवृत्त केले. आरोपींनी रेझरपे या पेमेंट गेटवेचा वापर करून नेट बँकिंग, फोन पे, गुगल पे द्वारे गराडे यांना १४ लाख ९६ हजार रुपयांची गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले. ९० दिवसात बोनससह रक्कम परत न करता गराडे यांची फसवणूक केली. वाकड पोलीस तपास करत आहेत.