२०३० पर्यंत शुन्य रस्ते अपघात,मृत्यू दर करण्याचे लक्ष्य : नितीन गडकरी

नितीन गडकरी म्हणाले, महामार्गावरील, राज्यातील आणि जिल्ह्यातील अपघात स्थळे शोधणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अपघातांची कारणे, जबाबदार कोण आणि समस्या शोधणे आवश्यक आहे. अपघात स्थळे शोधण्यासाठी महामार्ग मंत्रालय अधिक प्रयत्नशील आणि गंभीरही आहे. तामिळनाडू राज्याने ५३ टक्के रस्ते अपघात आणि मृत्यू दर कमी केले आहे. सामाजिक संघटना, शैक्षणिक संस्था व कॉर्पोरेट्समध्ये रस्ते सुरक्षेबाबत शिक्षण आणि जनजागृती करणे गरजेचे आहे

  पुणे : भारतातील रस्त्यांवर दरवर्षी पाच लाख अपघात होतात आणि त्यात दीड लाख लोकांचे मृत्यू होतात. एवढ्या मोठ्या प्रमाणात मृत्यू होणे अत्यंत दुर्दैवी असून लोकांच्या सहकार्यातून अपघातामुळे होणाऱ्या हजारो लोकांचे प्राण वाचवणे शक्य आहे. २०२५ पर्यंत ५० टक्के रस्ते अपघात आणि मृत्यू कमी करणे आणि २०३० पर्यंत शुन्य टक्के रस्ते अपघात व मृत्यू कमी करण्याचे आमचे लक्ष असल्याचे मत केंद्रीय रस्ते व महामार्ग वाहतूक, परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

  एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या एमआयटी स्कूल ऑफ इंजिनिअरिंग विभागातर्फे वाहन अपघात सुरक्षितता आंतरराष्ट्रीय परिसंवादाचे उद्घाटन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.यावेळी एमआयटी एडीटी विद्यापीठाचे संस्थापक प्रा. डॉ. विश्वनाथ कराड, हरियाणा येथील आयसीएटीचे संचालक दिनेश त्यागी, एआरएआयचे संचालक डॉ. रेजी मथाई, एसएई इंडियाचे रश्मी ऊरधवरशे, एमआयटी मिटकॉमच्या संचालिका डॉ. सुनीता कराड, प्र-कुलगुरू डॉ. अनंत चक्रदेव, डॉ. किशोर रवांदे, डॉ. सुदर्शन सानप आदी उपस्थित होते.

  अपघात स्थळे शोधणे अत्यंत महत्त्वाचे
  नितीन गडकरी म्हणाले, महामार्गावरील, राज्यातील आणि जिल्ह्यातील अपघात स्थळे शोधणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अपघातांची कारणे, जबाबदार कोण आणि समस्या शोधणे आवश्यक आहे. अपघात स्थळे शोधण्यासाठी महामार्ग मंत्रालय अधिक प्रयत्नशील आणि गंभीरही आहे. तामिळनाडू राज्याने ५३ टक्के रस्ते अपघात आणि मृत्यू दर कमी केले आहे. सामाजिक संघटना, शैक्षणिक संस्था व कॉर्पोरेट्समध्ये रस्ते सुरक्षेबाबत शिक्षण आणि जनजागृती करणे गरजेचे आहे.

  वाहन आभियांत्रिकीच्या माध्यमातून सुरक्षित वाहन निर्माण करण्याचे धैय आहे. वाहनांची क्रश टेस्ट, एअर बॅग्स्ा, ॲटी लॉक सिस्टिम यासारखे अनेक फिचर्स असणारे वाहन निर्मिती आमचा प्रयत्न आहे. प्रदुषण मुक्त भारतासाठी इलेक्ट्रीक वाहनाचा आणि पेट्रोल आणि डिझेलला पर्याय इंधनावरील वाहन निर्मितीला प्रथम प्राधान्य आहे. भारताला सर्वाधिक इलेक्ट्रीक वाहन निर्मिती करणार देश बनविण्याबरोबरच एसी ट्रक, रोड जंक्शन, ट्राफिक कमी करणे, लेन शिस्त पाळण्यावरती आमचा विशेष भर असणार आहे.

  महाराष्ट्रात संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गासाठी १२ हजार करोड रुपये खर्च करण्यात येणार आहे. पालखी मार्गावर रेडिया सेंटर उभारून संतांचे अभंग याद्वारे प्रसारित केले जाणार आहे. पुणे विभागातील विविध रस्त्यांच्या विकासासाठी एक लाख करोड रुपये खर्च करण्यात येणार आहे.

  -नितीन गडकरी,केंद्रीय मंत्री, रस्ते व महामार्ग वाहतूक