वाहनाच्या धडकेत झोमॅटो डिलिव्हरी बॉय ठार

भरधाव वाहनाने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरात धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने विश्वनाथ यांचा जागीच मृत्यू झाला.

    पिंपरी: डिलिव्हरी देण्यासाठी जात असलेल्या झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयच्या दुचाकीला भरधाव वाहनाने धडक दिली. यामध्ये डिलिव्हरी बॉयचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना तळेगाव – दाभाडे येथील सेंट माउंट चर्चसमोर नुकतीच घडली आहे.

    विश्वनाथ बाबू जमादार (वय ३३) असे मृत्यू झालेल्या डिलिव्हरी बॉयचे नाव आहे. अशोक प्रेमनाथ घोसले (वय ३८, रा. राजगुरूनगर, ता. खेड) यांनी तळेगाव – दाभाडे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी घोसले यांचे मेहूणे विश्वनाथ हे झोमॅटो कंपनीत डिलिव्हरी बॉयचे काम करत होते.

    रात्री आठच्या सुमारास जमादार हे चाकण – वडगाव रस्त्याने डिलिव्हरी देण्यासाठी दुचाकीवरून जात होते. ते सेंट माउंट चर्चसमोर आले असता भरधाव वाहनाने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरात धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने विश्वनाथ यांचा जागीच मृत्यू झाला. अपघात झाल्यानंतर वाहनचालक घटनास्थळी न थांबता तसेच घटनेची माहिती न देता पसार झाला. तळेगाव – दाभाडे पोलिस तपास करत आहेत.