फाईल फोटो

  • १०० मीटर मध्ये शमशुद्दिन चा प्रवास खऱ्या अर्थाने त्या दिवसापासून सुरू झाला त्याचबरोबर त्याने महाविद्यालयात एन.सी.सी.मध्ये देखील प्रवेश घेतला जे.एन.पी.टी उरण येथे झालेल्या एन सी सी कॅम्प मध्ये क्रॉसकंट्री क्रीडाप्रकारात महाड महाविद्यालया कडून सुवर्णपदक पटकाविणारा तो पहिला खेळाडू ठरला.

महाड : संपूर्ण देश सध्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाशी लढतो आहे या परिस्थितीचा सामना करण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊन चा फटका देशातील क्रीडा क्षेत्रालाही बसला आहे. १०० आणि २०० मीटर धावणे प्रकारात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारा शमशुद्दीन शेख हा युवा धावपट्टू सध्या महाड एमआयडीसी मधील कारखान्यात सिक्युरिटी गार्डची नोकरी करीत आहे. शमशुद्दिन चा प्रवास अतिशय नाट्यमय आणि खडतर असाच राहिला आहे.

लहानपणापासूनच त्याला खेळाची प्रचंड आवड होती. वडील रिक्षा ड्रायव्हर तर आई गवंडी काम करत. शमशुद्दीन याचे शालेय शिक्षण कसेबसे पूर्ण झाले. पहिली ते सातवी पैशाअभावी महाड नगरपालिका शाळेत शिक्षण पूर्ण झाले त्यानंतर आठवी ते दहावी शिक्षण घेण्याकरता त्याचा भाऊ शब्बीर शेख याने देखील मोलाचे योगदान दिले.

महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी शमशुद्दीन याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात प्रवेश घेतला. खो-खो खेळा मध्ये निपुण असल्याने महाविद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक समीर गाडगीळ सर यांनी त्याची निवड खो-खो संघांमध्ये केली. खो-खो चा सराव करत असताना त्याचा संघ सहकारी यांने त्याची वेगाने धावण्याची क्षमता ओळखून त्याला १०० मीटर धावणे स्पर्धेसाठी जास्तीत जास्त मेहनत घेण्याचा सल्ला दिला.

१०० मीटर मध्ये शमशुद्दिन चा प्रवास खऱ्या अर्थाने त्या दिवसापासून सुरू झाला त्याचबरोबर त्याने महाविद्यालयात एन.सी.सी.मध्ये देखील प्रवेश घेतला जे.एन.पी.टी उरण येथे झालेल्या एन सी सी कॅम्प मध्ये क्रॉसकंट्री क्रीडाप्रकारात महाड महाविद्यालया कडून सुवर्णपदक पटकाविणारा तो पहिला खेळाडू ठरला.

पुढे क्रीडा प्रशिक्षक समीर गाडगीळ सर यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई महाविद्यापीठाच्या मानाच्या समजल्या जाणाऱ्या डेकेथलॉन क्रीडा प्रकारात प्रथम वर्षी कांस्यपदक, द्वितीय वर्षी रौप्यपदक तर तृतीय वर्षी सलग तीन वेळा स्पर्धा जिंकणाऱ्या रितेश यादव याला पराभूत करत सुवर्णपदक पटकाविले.

पुढे त्याने एम ए चे शिक्षण उल्हासनगर महाविद्यालयातून पूर्ण करत असताना डेकेथलॉन मध्ये सलग दुसऱ्यांदा सुवर्णपदक पटकाविले शमशुद्दीन हॅट्ट्रिक साजरी करणार असे वाटत असतानाच त्याला दुखापत झाली तरी तो हॅट्ट्रिक पूर्ण करण्याकरिता मैदानात उतरला परंतु त्याला फक्त सात गुणांनी हॅट्रिक पासून वंचित राहावे लागले. सर्वांनी त्याच्या जिद्दीचे आणि कधीही हार न मानण्याच्या वृत्तीचे भरभरून कौतुक केले.

अनेक कठीण परिस्थितीवर मात करत आणि काही देणगीदारांच्या मदतीने शमशुद्दीन याने सराव सुरू ठेवला.  पुढे त्याने राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर १०० आणि २०० मीटर धावणे स्पर्धेत अनेक सुवर्णपदक देखील पटकाविले परंतु घरची हलाखीची परिस्थिती मुळे वेळेवर त्याला डाएट घेता येत नव्हता तसेच महाडमध्ये सुसज्ज मैदान आणि सुविधा अभावी महाराष्ट्रातील इतर खेळाडूंसोबत स्पर्धा करणे त्याला कठीण जात होते आणि त्याचे भवितव्य धोक्यात येताना दिसत होते. 

पुढे त्याने लग्न करण्याचा निर्णय घेतला घर चालविण्यासाठी महाडमधील नामांकित सेंट जेवियर्स शाळेमध्ये क्रिडा प्रशिक्षक म्हणून पार्टटाईम नोकरी करण्यास सुरुवात केली. त्याची मेहनत आणि शाळेमध्ये क्रीडा क्षेत्रात होणारी प्रगती बघून शाळेचे चेअरमन जॉन्सन डिसूझा यांनी शमशुद्दीन याची पूर्णवेळ क्रीडा प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली.

शमशुद्दिनने सेंट जेवियर्स शाळेत क्रीडा प्रशिक्षक म्हणून धुरा सांभाळण्यास सुरुवात केली तेव्हा पासून शाळेतील खेळाडू भालाफेक, वेटलिफ्टिंग, धावणे, बांबू उडी, थाळीफेक अशा अनेक स्पर्धेत राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचले आणि त्यांनी उल्लेखनीय कामगिरी देखील केली. डिसूजा सरांच्या मार्गदर्शनाखाली शमशुद्दीनने बीपीएड हा क्रीडा प्रशिक्षकाचा कोर्स देखील पूर्ण केला.

२०१९ मध्ये येथील फजनदार हायस्कूल मध्ये काम करण्याची संधी त्याला मिळाली. पहिल्याच वर्षी शाळेच्या क्रीडा क्षेत्रात शमशुद्दीन च्या प्रशिक्षणा खाली खेळाडूंनी उंच भरारी घेत जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत उत्तम कामगिरी केली. परंतु मार्च महिन्यापासून संपूर्ण जगावर कोरोना महामारी चे संकट उद्भवले. चार महिने उलटून गेले तरी देखील कोरोना रुग्ण संख्या कमी न होता झपाट्याने वाढत आहे. शाळा लवकर सुरू होण्याची कोणतीही चिन्हे सध्या दिसत नसल्यामुळे घर कसे चालवावे असा मोठा प्रश्न त्याच्यासमोर उद्धवला.

शेवटी त्याने महाड एमआयडीसी मध्ये नोकरी शोधण्यास सुरुवात केली कोणत्याही कंपनीमध्ये काम करण्यास संधी मिळाली नाही , शेवटी कोणताही पर्याय समोर दिसत नसल्याने मित्राच्या सांगण्यावरून एका नामांकित कंपनीमध्ये बारा तास सिक्युरिटी गार्डची नोकरी करण्याचा त्यानी निश्चय केला. कोरोनामुळे शमशुद्दीन सारख्या होतकरू तरुणांचा पैशा अभावी खेळखंडोबा होत आहे हे मात्र नक्की.

 कोरोनामुळे सम्पूर्ण जगावर संकट कोसळले आहे कित्येकांच्या नोकऱ्या गेल्या, पगार कपात करण्यात आली. महाराष्ट्रातील शाळा लवकर सुरू होतील का ते माहित नाही परंतु मला माझ्या कुटुंबाची जबाबदारी घेणे भाग आहे त्यामुळे आता माझ्याकडे सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करण्याखेरीज पर्याय नाहीये परंतु मी हे काम अतिशय प्रामाणिक पणे करीत आहे आणि मी त्यात खुश आहे. – शमशुद्दीन शेख, १००,२००मी धावपट्टू.