श्रीवर्धन तालुक्यात मागील तीन दिवसात १७ कोरोना बाधित रुग्णांची नोंद

श्रीवर्धन: श्रीवर्धन तालुक्यात (shrivardhan taluka) ३० व ३१ ऑगस्ट रोजी तर १ सप्टेंबर रोजी एकही कोरोना (corona) बाधित रुग्ण सापडला नव्हता. या काळामध्ये अनेक रुग्ण विलगीकरणात बरे होऊन घरी आहेत. मात्र दोन सप्टेंबर रोजी ७ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले तर तीन सप्टेंबर रोजी ८ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले व आज चार सप्टेंबर रोजी २ करोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आता कोरोनावर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या २१ झाली आहे. तर एकूण बाधितांची संख्या २४५ असून त्यापैकी सतरा जण मृत्यू पावले आहेत. तर २०९ जण पूर्णपणे बरे झाले आहेत.

आता अनेक नागरिक सर्दी खोकला व ताप या आजारांवर खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. कारण शासकीय रुग्णालयात गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांचा स्वॅब घेण्यात येतो व तो पॉझिटिव्ह येतो. असे अनेक नागरिकांचे म्हणणे आहे. कोरोनाचे संकट आल्यापासून अनेक नागरिकांनी वारंवार हात धुणे, गरम पाण्याचा वाफारा घेणे, हळद टाकलेले दूध पिणे, त्याचप्रमाणे गरम खाद्यपदार्थ खाणे या सवयीचा अवलंब केल्यामुळे ते कोरोनापासून चार हात दूर आहेत. काहीजणांना अन्य व्याधी असल्यामुळे ते कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांचा आजार गंभीरपणे बळावतो असे दिसून आले आहे. कारण यावर्षी पावसाळा सुरू झाल्यानंतरही डेंग्यू ,मलेरिया, टाइफाइड, लेप्टोस्पायरोसिस, चिकुनगुनिया यासारखे कोणतेही आजार आढळून आले नाहीत.