श्रीवर्धनमध्ये येऊन गेलेल्या कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कातील २७ जण पनवेलमध्ये तपासणीसाठी रवाना

श्रीवर्धन : रायगड जिल्हात कोरोनाने आता थैमान मांडले आहे. महाराष्ट्र राज्यातील मुंबई व पुणे हे कोरोनाचे हाॅटस्पाॅट वाटत असले तरी आता त्याने एक पाऊल पुढे टाकून रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन

 श्रीवर्धन : रायगड जिल्हात कोरोनाने आता थैमान मांडले आहे. महाराष्ट्र राज्यातील मुंबई व पुणे हे कोरोनाचे हाॅटस्पाॅट वाटत असले तरी आता त्याने एक पाऊल पुढे टाकून रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यात शिरकाव केला आहे. भोस्ते येथील एक रुग्णाचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला होता. त्या रुग्णाला पनवेल येथे ११ एप्रिल रोजी पाठवण्यात आले होते. आता तर त्या कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या एकूण २७ रुग्णांना कोरोनाची चाचणी करण्यासाठी श्रीवर्धन मधून पनवेल या ठिकाणी नेण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

याच महिन्यामध्ये श्रीवर्धन तालुक्यातील एक व्यक्ती कत्तार येथून आली होती. ती व्यक्ती पनवेल,  कळंबली या ठिकाणी त्यांच्या बहिणकडे उतरली होती. त्या नंतर बोर्ली व श्रीवर्धन त्यांच्या नातेवाईकांच्या निवासस्थानी आली होती. परंतु त्याच्या संपर्कात आलेल्या एका व्यक्तीला दम्याचा त्रास जाणवू लागला व  तो दवाखान्यात तपासणीसाठी गेला .त्याला प्राथमिक काही लक्षणे आढळून आल्याने श्रीवर्धनच्या प्रशासकीय अधिकारी वर्गाने त्यांना व त्यांच्या संपर्कात आलेल्या ७ व्यक्तींना श्रीवर्धन येथून पनवेल  येथे तपासणी करण्यासाठी पनवेल येथेल शासकीय रुग्णालयात नेण्यात आले होते. त्या ७ रुग्णांची  कोरोनाची चाचणी निगेटिव्ह आली होती. त्यावेळी मात्र श्रीवर्धन तालुक्यातील जनतेला दिलास मिळाला. मात्र रिपोर्ट येईपर्यंत श्रीवर्धन तालुक्यातील नागरिकांमध्ये खुप भीतीदायक वातावरण निर्माण झाले होते.

दक्षिण रायगडमधील श्रीवर्धन तालुक्यातील भोस्ते या गावात वरळी जनता कॉलनी येथून आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण होऊन त्याचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याने आता मात्र श्रीवर्धन तालुक्यातील नागरिकांनामध्ये  मोठ्या प्रमाणात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या  श्रीवर्धनमधील २७ व्यक्तींना कोरोनाची चाचणी करण्यासाठी पनवेल येथील ग्रामविकास भवन या ठिकाणी पाठवण्यात आले आहे. त्यामध्ये २० पुरुष व   ७ महिलांचा समावेश असल्याचे समजते. यामध्ये १ डॉक्टर , पॅथोलाॅजची लॅबचे कर्मचारी, रिक्षा ड्रायव्हर , मित्र आणि नातेवाईक, यांचा त्या बाधित व्यक्तीजवळ संपर्क झाल्याचे प्राथमिक चौकशीत आढळुन आले आहे.श्रीवर्धन तालुक्यातील खेड्यापाड्यांमध्ये लाॅकडाऊनच्या कालावधीत लपुन छपून काही व्यक्ती मुंबईमधून श्रीवर्धन तालुक्यात आल्या असुन प्रशासनाने आता त्यांचाही शोध घेऊन त्यांची पण चाचणी घेणे क्रमप्राप्त आहे.मात्र याकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते आहे.तसेच पुणे शहरातील अनेक व्यक्तींची श्रीवर्धन तालुक्यात फार्म हाऊस आहेत. ते सुध्दा पुण्यातील आपले घर सोडून श्रीवर्धन मध्ये आलेले आहेत.

 
दरम्यान श्रीवर्धन भोस्ते गाव पुर्ण सील केले असुन त्या गावाच्या परिसरातील  ३ किलोमीटरपर्यंत सर्व सीमा पुर्णपणे बंद करण्यात आल्या आहेत. ५ किलोमीटर अंतरापर्यंत श्रीवर्धन पोलीस ठाण्याकडून सतर्क पहारा ठेवण्यात येत आहे. श्रीवर्धनमधील २७ व्यक्तींची तपासणी करण्यासाठी पनवेल येथील ग्रामविकास भवन या ठिकाणी पाठवण्यात आले आहेत. त्यामध्ये २०पुरुष व ७ महिलांचा समावेश आहे. तसेच श्रीवर्धन तालुक्यात सुमारे ७ ते ८ हजार व्यक्तींना होम क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे.