रायगड जिल्ह्यात शाळेच्या पहिल्या दिवशी उपस्थिती साडेचार टक्के,३९.४८ टक्के शिक्षकांनी केली कोरोना चाचणी

आठ महिन्यांनंतर आज अनेक ठिकाणी शाळा सुरु झाल्या. रायगड जिल्ह्यातील शाळांमध्ये नववी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती ४.४६ टक्के होती.

सुभाष म्हात्रे, अलिबाग : तब्बल आठ महिन्यानंतर सुरु झालेल्या रायगड जिल्ह्यातील शाळांचा पहिला दिवस गोंधळातच गेला असून, या गोंधळात नववी ते बारावीपर्यंतच्या वर्गात फक्त ४.४६ टक्के विद्यार्थांची उपस्थिती होती. शिक्षकांना कोरोना चाचण्या सक्तीच्या करण्यात आल्या. मात्र आजपर्यंत केवळ ३९.४८ टक्के शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोरोना तपासण्या पूर्ण करता आल्याने अनेक शाळांमधील शिक्षकदेखील शाळेत येऊ शकले नाहीत. या सर्व संभ्रमात केवळ ३५.५५ टक्के शाळा पहिल्या दिवशी सुरु झाल्या.

पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील शाळांचा यामध्ये समावेश नव्हता. विद्यार्थी संख्या पाहून सकाळ आणि दुपार अशा दोन सत्रात वर्ग भरणार होते. वर्गामध्ये येताना आपल्या पाल्याला शाळेत पाठविण्यास कोणतीही हरकत नाही, अशा संदर्भाचे पत्र घेऊन येण्यास अनेक शाळांनी सांगितले होते. पालकांच्या मनातही संभ्रमावस्था असल्याने अनेक पालकांनी संमती पत्र देण्याचे नाकारले. हे एकूण विद्यार्थी उपस्थितीवरुनच दिसून येत आहे.

१ लाख ३५ हजार ७९७ विद्यार्थ्यांपैकी ६ हजार ०६६ विद्यार्थीच वर्गात हजर होते. सर्वात जास्त विद्यार्थी संख्या पनवेल ग्रामीणमध्ये १ हजार ४०५ इतकी होती. महाड तालुक्यात एकही शाळा सुरु झालेली नाही. पहिल्याच दिवसाच्या अल्प प्रतिसादामुळे जिल्हा प्रशासन शाळा सुरु कराव्यात का, यावर विचार करु लागले आहेत. पनवेल महानगरपालिका हद्दीतील शाळा सुरु होण्याचा कालावधी ३१ डिसेंबरपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्याच्या इतरही भागात कोरोना आटोक्यात येत असताना शाळा सुरु केल्याने यात वाढ होईल, असे आजच्या पहिल्याच दिवशी पालकांनी मते मांडली आहेत.

२१ शिक्षक कोरोना पॉझिटीव्ह
तपासणी केलेल्या एकूण ४ हजार २६४ शिक्षकांमधील २१ शिक्षकांच्या तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. यात शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. १० हजार ८०० शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना वर्ग सुरु करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. यातील फक्त ३९.४८ टक्के शिक्षकांनाच तपासणी करता आलेली आहे. यातही अनेक शिक्षकांना तपासणी अहवाल मिळालेला नाही. शिक्षकच पॉझिटीव्ह सापडत असल्याने पालकदेखील धास्तावले आहेत.

प्रत्येक शाळा व्यवस्थापन समित्यांना वर्ग सुरु करण्यासाठी आवश्यक तयारीच्या सुचना देण्यात आल्या होत्या. सर्व तालुक्यांमधून किती शाळा सुरु झाल्या, याचा आढावा वरिष्ठांना सादर केला जाणार आहे. त्यानुसार शाळा सुरु कराव्यात किंवा नाही, यावर निर्णय घेतला जाईल.

- बी.एल. थोरात. शिक्षणाधिकारी, (माध्यमिक) रायगड जिल्हा परिषद

पहिल्या दिवसाचा शाळा सुरु झाल्याचा तपशील- तालुकानिहाय आकडेवारी

अलिबाग- एकूण शाळा-४६, सुरु झालेल्या शाळा -२४ , उपस्थित विद्यार्थी- ६५७
पेण – एकूण शाळा- ४२, सुरु झालेल्या शाळा -४२, उपस्थित विद्यार्थी -१६५
कर्जत- एकूण शाळा- ५४, सुरु झालेल्या शाळा -३, उपस्थित विद्यार्थी -४२
खालापूर – एकूण शाळा- ४७, सुरु झालेल्या शाळा -१०, उपस्थित विद्यार्थी -१६२
उरण- एकूण शाळा- २९, सुरु झालेल्या शाळा -४, उपस्थित विद्यार्थी -२४४
पनवेल- एकूण शाळा- १६३, सुरु झालेल्या शाळा -३८, उपस्थित विद्यार्थी -१४०५
महाड- एकूण शाळा- ५५, सुरु झालेल्या शाळा -०, उपस्थित विद्यार्थी -०
म्हसळा – एकूण शाळा- २१, सुरु झालेल्या शाळा -१८, उपस्थित विद्यार्थी -७०४
पोलादपूर – एकूण शाळा- १९, सुरु झालेल्या शाळा -०७, उपस्थित विद्यार्थी -७२
श्रीवर्धन – एकूण शाळा- २३, सुरु झालेल्या शाळा -११, उपस्थित विद्यार्थी -७१३
मुरुड – एकूण शाळा- १९, सुरु झालेल्या शाळा -०६, उपस्थित विद्यार्थी -१८३
रोहा – एकूण शाळा- ४७, सुरु झालेल्या शाळा -१३, उपस्थित विद्यार्थी -२१७
माणगाव – एकूण शाळा- ४८, सुरु झालेल्या शाळा -३०, उपस्थित विद्यार्थी -८१४
सुधागड पाली – एकूण शाळा- १९, सुरु झालेल्या शाळा -१६, उपस्थित विद्यार्थी -५००
तळा – एकूण शाळा- १२, सुरु झालेल्या शाळा -०७, उपस्थित विद्यार्थी -१८८
जिल्ह्यातील एकूण शाळा- ६४४, सुरु झालेल्या शाळा-२२९, उपस्थित विद्यार्थी -६०६६