अरबी समुद्रात तयार होतोय कमी दाबाचा पट्टा, मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या मत्स्य व्यवसाय विभागाच्या सूचना.

श्रीवर्धन : नैऋत्य मोसमी पाऊस यावेळेला जूनच्या पाच तारखेपर्यंत केरळच्या किनारपट्टीवर धडकेल असा अंदाज वेधशाळेने व्यक्त केला होता. परंतु नुकत्याच झालेल्या बंगालच्या उपसागरातील अंफाम चक्रीवादळामुळे

श्रीवर्धन : नैऋत्य मोसमी पाऊस यावेळेला जूनच्या पाच तारखेपर्यंत केरळच्या किनारपट्टीवर धडकेल असा अंदाज वेधशाळेने व्यक्त केला होता. परंतु नुकत्याच झालेल्या बंगालच्या उपसागरातील अंफाम चक्रीवादळामुळे मान्सूनचे आगमन लवकर झाले आहे. यावर्षी ३० मे रोजी मान्सून केरळ किनारपट्टीवरती धडकला आहे. अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार होत असून यामुळे वादळी हवामान राहील असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. त्यानुसार राज्याच्या मत्स्यव्यवसाय विभागाने राज्यातील सर्व मच्छीमार संस्था त्याचप्रमाणे तत्सम संस्था यांना आदेश काढला आहे की १ जून ते ४ जून या काळामध्ये कोणीही आपल्या नौका समुद्रात घेऊन जाऊ नये. वादळी वातावरणामुळे जीवित व वित्त हानी होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षीसुद्धा पावसाळ्याच्या सुरुवातीला अगोदर क्यार नावाचे चक्रीवादळ अरबी समुद्रात तयार झाले होते. या वादळाचा तडाखा सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्याला बसला परंतु हे वादळ रायगड कडे न सरकता ते ओमान या देशाच्या दिशेने सरकल्याने रायगड जिल्हा, मुंबई, पालघर तसेच गुजरात या ठिकाणी वादळाचे परिणाम दिसून आले नाहीत. कालपासूनच श्रीवर्धन येथे देखील अरबी समुद्राच्या पाण्यामध्ये विविध प्रकारचे बदल पाहायला मिळत आहेत. समुद्राच्या पाण्याचा आवाज वाढला असून पाण्याचा रंगदेखील तांबूस झाला आहे. त्यामुळे मच्छीमार बांधवांनी आपल्या नौका कालपासूनच समुद्रा बाहेर घेण्यास सुरुवात केली आहे. १ जून ते ३० जुलै कोकण किनारपट्टीवरील मासेमारी शासकीय आदेशानुसार बंद असते. त्यामुळे मच्छीमार बांधव आपल्या नौका समुद्रातुन बाहेर घेऊन त्या शाकारुन ठेवतात. आज दुपारपासून देखील श्रीवर्धन परिसरामध्ये जोरदार वारे सुटल्याचे पाहिला मिळाले.