अलिबागमध्ये निसर्गाचा वेगळाच चमत्कार, निळ्या रंगाच्या लाटांनी नागरिक सुखावले

नागावच्या समुद्रकिनाऱ्यावर ( Nagaon beach) प्रथमच या अनपेक्षित दिसणाऱ्या निळ्या लाटा पाहून स्थानिकांनी आपल्या मोबाईलमध्ये चित्रीत करण्यास सुरूवात केली, तर अनेकांनी समुद्रकिनारी जाऊन प्रत्यक्षात हे आश्चर्य अनुभवले आहे. नागावच्या किनाऱ्याच्या लाटा उजळून टाकणारे हे जीव आले असल्याचे बोलले जात असून, त्याचे शास्त्रीय नाव `नॉकटील्युका’ आहे.

अलिबाग : तालुक्यातील नागाव समुद्रकिनारी ( Nagaon beach) बुधवारच्या संध्याकाळपासून समुद्राच्या पाण्याचा रंग बदलण्यास सुरूवात झाली असून, किनाऱ्यावर येणाऱ्या लाटा वेगवेगळ्या ठिकाणी निळ्या रंगाने प्रकाशमान होताना दिसू लागल्याने अनेकांना धक्काच बसला आहे. यानिमित्ताने नागरिकांना निसर्गाचा एक वेगळाच चमत्कार पहायला मिळत असून, या लाटा पाहण्यासाठी पर्यटकांचीही तेथे गर्दी होत आहे.

नागावच्या समुद्रकिनाऱ्यावर प्रथमच या अनपेक्षित दिसणाऱ्या निळ्या लाटा पाहून स्थानिकांनी आपल्या मोबाईलमध्ये चित्रीत करण्यास सुरूवात केली, तर अनेकांनी समुद्रकिनारी जाऊन प्रत्यक्षात हे आश्चर्य अनुभवले आहे. नागावच्या किनाऱ्याच्या लाटा उजळून टाकणारे हे जीव आले असल्याचे बोलले जात असून, त्याचे शास्त्रीय नाव `नॉकटील्युका’ आहे. समुद्राच्या पाण्याबरोबर हे सूक्ष्म प्लवंग किनाऱ्यावर येतात आणि जेव्हा ते एखाद्या गोष्टीच्या संपर्कात येतात तेव्हा प्रकाशमान होतात. या प्राण्यांमध्ये जैविक प्रकाश निर्माण करण्याची क्षमता असते. यामुळे किनाऱ्यावर येऊन जेव्हा लाटा फुटतात तेव्हा ते प्रकाशमान होतात आणि संपूर्ण लाट उजळून जाते असे समजते.

नागावमध्ये प्रथमच या जीवांचे दर्शन झालेले असले, तरी ते मोठ्याप्रमाणावर असल्याचे मच्छिमारांनी सांगितले.  स्थानिक भाषेत याला “पाणी पेटले” किंवा “जाळ” असेही म्हणतात. असा प्रकार पहिल्यांदाच झालेला असला, तरी अशाप्रकारे पश्चिम किनारपट्टीवर काही वर्षे घडत असल्याचे जुन्याजाणत्या मच्छिमारांनी सांगितले. मात्र आता त्यांचे प्रमाण वाढल्याने ते नजरेत येऊ लागले आहेत. साधारणपणे थंडीचा मोसम सुरू झाला की, अशा प्रकराचे काहीना काही बदल हवामानात होतात व त्याचा परिणाम समुद्राच्या जीवांवरही होतो. त्याचच एक हा भाग आहे. तापमानातील बदलामुळे हे जीव इतक्या मोठ्यासंख्येत देशाच्या पश्चिम किनाऱ्यावर आल्याचे या विषयाचे अभ्यासक सांगतात.

स्थानिकांसाठी आकर्षणाचा विषय ठरत असलेल्या या चमकणाऱ्या लाटा म्हणजे अलिबागला येणाऱ्या पर्यटकांसाठी तर एक नवी पर्वणीच असल्याचे मच्छिमारांचे म्हणणे आहे. नागावच्या समुद्रकिनाऱ्यांवर सध्या सगळ्याच ठिकाणी चकाकणाऱ्या निळ्या लाटा दिसताहेत. त्या लाटा पाहण्यासाठी पर्यटकांचीही गर्दी होत आहे. नॉकटील्युका हा समुद्रातील प्राणी असल्याने त्यामुळे पाण्याचा रंग बदललेला दिसतो आहे. नॉकटील्युका सिंटीलांस या शास्त्रीय नावाने तो ओळखला जातो. सध्या समुद्रात दिसणाऱ्या निऑन लाईट्ससारख्या हिरव्या निळ्या प्रकाशाने तो चर्चेत आला आहे. सी स्पार्कल म्हणूनही तो ओळखला जातो.

सध्या जगभर या प्राण्यावर संशोधन केले जात आहे, ते त्याच्या थंडीमध्ये अचानक येणाऱ्या विंटर ब्लूम्समुळे! उत्तर अरेबियन समुद्र ते अरेबियन पेनिन्सुलादरम्यान हे प्राणी मोठ्या प्रमाणात सध्या दिसत आहेत. एरव्ही दिवसा लालसर रंगाने दिसणारा हा प्राणी सध्या हिरवट रंगाचा दिसून येत आहे आणि दिवसा पाण्यावर हिरवट शेवाळासारखा थर दिसून येत आहे. त्याचे कारण म्हणजे या प्राण्याने आपल्या शरिरात पेडीमोनाज नॉकटील्युके या शेवालवर्गीय सजीवांना आसरा दिला आहे. त्यामुळे तो हिरवट दिसतो आणि त्याच्या मदतीने प्रकाश संश्लेषण करून अन्नही प्राप्त करू शकतो.

प्लवंग त्यातही खास करून डायटम्स, डायनोफ्लॅजेलेट्स, माशांची व इतर जलचरांची सूक्ष्म अंडी, जिवाणू यावर उपजीविका करणारा हा प्राणी. म्हणूनच अन्न उपलब्ध नसेल तरीही तो जगू शकतो. त्यांचे खाद्य जेथे मोठ्या प्रमाणात उपलब्ध असेल तिथे यांचे प्रमाणही वाढते. त्यात मोठ्या प्रमाणात साठणाऱ्या अमोनियामुळे जेलीफिश सोडल्यास इतर कोणी त्याला खात नाहीत. हा अमोनिया इतर जलचरांना घटक ठरू शकतो. किनाऱ्याकडे सूक्ष्म खाद्याची उपलब्धता आणि वातावरण असल्याने नॉकटील्युकाचे थवे किनाऱ्याकडे सरकतात. या ब्लूम्समुळे समुद्रातील डायटम्सच्या प्रमाणात मात्र लक्षणीय घट झाली आहे. कारण डायटम्स हे वनस्पती प्लवंग समुद्रातील प्राथमिक उत्पादक आहेत आणि समुद्रातील जैव साखळीही या प्लवंगावर अवलंबून असते.

समुद्राच्या पाण्यावर नॉकटील्युका किंवा इतर जैविक प्रकाश निर्माण करणाऱ्या जलचरांच्या निळ्या प्रकाशाला मारेल असेही म्हटले जाते. भारतात जुलै २०१५ मध्ये केरळमधील अलेप्पी येथे हा प्रकार प्रथम नोंदविला गेला. गोव्याच्या राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेने तसेच केरळच्या मत्स्य व्यवसाय खात्याने यावर अभ्यास केला आणि या ब्लूम्स नॉकटील्युकाच्या असल्याचे समोर आले. अचानक या प्राण्याच्या संख्येत अशी प्रचंड वाढ का झाली असावी हा संशोधनाचा विषय आहे. यामध्ये दोन कारणे असून, त्यात समुद्राच्या पाण्यात कमी झालेला ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडचे वाढलेले प्रमाण, हिमालयन तिबेटीयन पठारावरील ग्लेशियर्सचे कमी होत जाणारे प्रमाण आणि त्यामुळे तेथून येणाऱ्या थंड वाऱ्यांवर झालेला परिणाम ही कारणे प्रामुख्याने समोर येत आहेत.

समुद्रातील वाढते प्रदूषण, त्याच्या कुजण्याची तयार होणारी ऑक्सिजन विरहित डेड झोन्स हे एक प्रकारे नॉकटील्युकाच्या वाढीस मदतच करतात. म्हणूनच यावर संशोधन करण्याची गरज आहे. याच्या सुंदर निळसर प्रकाशात चमकणाऱ्या समुद्राच्या लाटा आपल्याला आकर्षित करतात पण या सौंदर्यामागील कारणांवर विचार करणे महत्वाचे ठरेल अशीही चर्चा होत आहे.