चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे करताना प्रत्येक लहानसहान गोष्टीची नोंद घ्या – पालकमंत्री आदिती तटकरे

पनवेल : जिल्हा प्रशासनाने निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे करताना नुकसान झालेल्या प्रत्येक लहानसहान गोष्टींचीही नोंद काटेकोरपणे घ्यावी, असे पालकमंत्री आदिती तटकरे यांनी आज

 पनवेल : जिल्हा प्रशासनाने निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे करताना नुकसान झालेल्या प्रत्येक लहानसहान गोष्टींचीही नोंद काटेकोरपणे घ्यावी, असे पालकमंत्री आदिती तटकरे यांनी आज चक्रीवादळामुळे झालेले नुकसान व प्रशासन करीत असलेल्या कार्यवाहीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात घेतलेल्या आढावा बैठकीत सांगितले. यावेळी खा.सुनिल तटकरे, जिल्हाधिकारी निधी चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, अपर जिल्हाधिकारी डॉ.भरत शितोळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) रविंद्र मठपती, सर्जेराव मस्के पाटील (सा.प्र.),  जिल्हा कृषी अधीक्षक पांडुरंग शेळके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर मोरे, जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक, जिल्हा परिषद पशुसंवर्धन अधिकारी डॉ.बी.के आर्ले, जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी लक्ष्मण खुरकुटे, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा आर.पी.कोळी, शाखा अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा, जिल्हा परिषद पी.एस.जोशी, तहसिलदार विशाल दौंडकर, सतिष कदम उपस्थित होते.

 या आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना पालकमंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, जिल्ह्यातील ३ जून रोजीच्या निसर्ग चक्रीवादळामुळे जिल्ह्यात खूप मोठ्या प्रमाणावर घरांची, झाडांची, विजेच्या खांबांची पडझड झाली. गावोगावी मोठ्या प्रमाणावर नागरिकांच्या मालमत्तेचे, फळबागांचे नुकसान झाले आहे. दरम्यान ५ जून रोजी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकसानग्रस्तांसाठी १०० कोटी रुपयांची तातडीची मदत जाहीर केली. त्यापैकी आतापर्यंत ७२ कोटी रुपयांचे अनुदान जिल्ह्याला प्राप्त झाले असून मदत वाटपाचे काम सुरु आहे. ही मदत जिल्ह्यासाठी पुरेशी नसल्याने वाढीव मदत देण्याची मागणी शासनाकडे करण्यात आली होती. त्यानुसार राज्य शासनाने आणखी ३०१ कोटींची मदत रायगड जिल्ह्यासाठी जाहीर केली आहे. यापैकी २४२ कोटींची मदत ही घरांच्या नुकसान भरपाईसाठी आहे. आतापर्यंत केलेल्या पंचनाम्यांनुसार घरांचे अंदाजे ३९५ कोटींचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. अजूनही पंचनाम्यांचे काम सुरुच आहे. ज्या मच्छिमारांच्या होड्यांचे नुकसान झाले आहे, त्यापैकी अंशत: नुकसानीसाठी १० हजार रुपयांची मदत तर ज्या होड्यांचे पूर्णत: नुकसान झाले आहे,त्यांना २५ हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे. जिल्हा प्रशासनाकडे ३०१ कोटी रुपये  प्राप्त होताच ही मदत नुकसानग्रस्तांच्या खात्यामध्ये तात्काळ जमा करण्यात येईल असे पालकमंत्री आदिती तटकरे यांनी सांगून  जिल्हा प्रशासनाने पंचनामे करताना नुकसान झालेल्या प्रत्येक लहानसहान गोष्टींचीही नोंद काटेकोरपणे घ्यावी, अशा सूचनाही संबंधितांना दिल्या.