श्रीवर्धन तालुक्यातील वादळ ग्रस्तांची शासनाकडून उपेक्षाच, अद्याप आर्थिक मदत व नुकसान भरपाईचा पत्ता नाही ?

अरबी समुद्रात तयार झालेल्या चक्रीवादळाने हरिहरेश्वर, श्रीवर्धन किनाऱ्यावरती ३ जून रोजी जोरदार धडक दिल्याने संपूर्ण श्रीवर्धन तालुका त्याचप्रमाणे सुप्रसिद्ध तीर्थ क्षेत्र हरिहरेश्वर पूर्णपणे उद्ध्वस्त

अरबी समुद्रात तयार झालेल्या चक्रीवादळाने हरिहरेश्वर, श्रीवर्धन किनाऱ्यावरती ३ जून रोजी जोरदार धडक दिल्याने संपूर्ण श्रीवर्धन तालुका त्याचप्रमाणे सुप्रसिद्ध तीर्थ क्षेत्र हरिहरेश्वर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. वादळानंतर संपूर्ण तालुक्यातील वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे तसेच मोबाईल नेटवर्क बंद असल्याने कोणाचा कोणाशीही संपर्क होत नव्हता. प्रथम दर्शनी श्रीवर्धन तालुक्यात किती मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे याचा पत्ता शासकीय यंत्रणांना देखील लागला नव्हता. वादळ झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी या ठिकाणी आपल्या ओबी व्हॅन घेऊन आल्यानंतर लाईव्ह दृश्य दाखवत होते. त्यामुळे संपूर्ण जगाला श्रीवर्धन तालुक्यात काय अवस्था आहे हे समजून आले. श्रीवर्धन तालुक्यात आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले आहे तसेच अनेकांची घरे पूर्णपणे पडली आहेत.

वादळ होऊन गेल्यानंतर राजकीय नेत्यांच्या दौऱ्याचे श्रीवर्धनला उधाण आले होते. वेगवेगळ्या  पक्षाचे वरिष्ठ नेते त्याचप्रमाणे विधानसभेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, खासदार सुनील तटकरे, मंत्री आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, महाराष्ट्र राज्याचे मंत्री बाळासाहेब थोरात, महाडचे माजी आमदार माणिकराव जगताप, महाडचे शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांचे श्रीवर्धन तालुक्यात दौरे झाले. सर्वांनी या ठिकाणी तातडीने नुकसानभरपाई दिली जाईल व मदत दिली जाईल. अशी आश्वासने दिली परंतु आज प्रत्यक्षात वादळ होऊन गेल्यानंतर तेरावा दिवस उजाडला तरी कोणत्याही प्रकारची मदत श्रीवर्धन तालुक्यातील जनतेला मिळालेली नाही.

शासनाकडून किराणा सामान मिळत असले तरी किराणा सामान मिळाल्यानंतर ते शिजवायचे कुठे, कारण डोक्यावर छप्पर नाही. असा प्रश्न प्रत्येक नागरिकाला भेडसावत आहे. अनेकांनी आपल्या घरात असलेले सोन्याचे दागिने गहाण ठेवून किंवा उधारी उसनवारी पैसे घेऊन घरांची छपरे दुरुस्त केली आहेत. कारण पावसाळा तोंडावर आलेला आहे. एकूणच शासनाकडून श्रीवर्धन  तालुक्यातील जनतेची उपेक्षाच करण्याचे प्रकार सुरू असल्याचे पाहायला मिळत आहेत. कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन असल्यामुळे अगोदरच तीन ते चार महिने रिकामटेकडे बसलेल्या नागरिकांच्या हातात कोणत्याही प्रकारचा पैसा नाही. तरी शासनाने जनतेचा अंत पाहू नये अन्यथा जनतेतून या गोष्टीबाबत उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.