चौथा लॉकडाऊन संपल्यानंतर, अत्यावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत नागरिकांची गर्दी

सुतारवाडी - चौथा लॉकडाऊन संपल्यानंतर अत्यावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी कोलाड बाजारपेठ तसेच रोहा शहरात भलीमोठी नागरिकांची गर्दी पहावयास मिळत आहे. दैनंदिन लागणारे सामान तसेच पावसाळ्यातील साठवणुकीच्या

सुतारवाडी – चौथा लॉकडाऊन संपल्यानंतर अत्यावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी कोलाड बाजारपेठ तसेच रोहा शहरात भलीमोठी नागरिकांची गर्दी पहावयास मिळत आहे. दैनंदिन लागणारे सामान तसेच पावसाळ्यातील साठवणुकीच्या वस्तू मोठ्या प्रमाणावर खरेदी केल्या जात आहेत. ३ जूनला निसर्ग चक्रीवादळामुळे अनेकांच्या घरावरील पत्रे उडाले होते ते पत्रे खरेदीसाठी अनेक ठिकाणी रांगा लागलेल्या दिसतात. ज्यांना पत्रे मिळतात ते भाग्यवान ठरले. बाकींना पुन्हा पत्रे येतील या आशेवर प्रतीक्षा करावी लागत आहे.

कोलाड, रोहा या ठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी जाणवत असून ठराविक व्यक्ती मास्कचा वापर करत असताना दिसत आहेत. तसेच डिस्टन्सचा मोठा फज्जा उडाला असून कोणीही गांभीर्याने हा नियम पाळताना दिसत नाही. मच्छी मार्केट,  मटन शॉप,  चिकन सेंटर तसेच पत्रे खरेदी, भाजीपाला खरेदी अशा वेळी मास्क न लावणाऱ्यांची तसेच डिस्टन्स न ठेवताच खरेदी करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. एक तर रायगड जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना संख्या वाढत आहे. अशा वेळी अति दक्षता घेणे अत्यंत गरजेचे असताना नागरिकांनी आपले कर्तव्य पार पाडणे गरजेचे आहे. मुंबई शहरातून येणाऱ्या नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. क्वॉरनटाईन प्रथा जवळजवळ बंद झालेली दिसत आहे. त्यामुळे आता मोठी भीती निर्माण झालेली आहे.

बाजारामध्ये मेणबत्यांचा मोठा तुटवडा भासत आहे. एक मेणबत्ती काही ठिकाणी दहा रुपयाला विकली जात आहे. सामान्य माणूस एकतर आर्थिक संकटाने मेटकुळीस आला असून चढ्या भावाने होत असलेल्या वस्तूंच्या विक्री बाबत अनेक जण चिंतेत आहे. या काळात काही दुकानदारांनी चांगलाच हात मारल्याचे बोलले जात आहे ही वस्तुस्थिती खरी आहे. कोलाड तसेच रोहा बाजारपेठेतील ए.टी.एम वर रांगा दिसूत असून पावसापासून बचाव करण्यासाठी लोक डिस्टनचा वापर न करता आपल्या नंबर ची वाट पाहत असताना एकंदरीत चौथ्या लॉकडाऊन नंतर सर्वत्र मोकळीक मिळाल्यासारखे नागरिक वावरताना दिसत आहेत. कोणीही गांभीर्याने वागत नसल्याचे चित्र दिसत आहे.