आंबेत – म्हाप्रळ पूल सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद

म्हसळा :कोरोना विषाणू प्रभावित क्षेत्रातून रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात प्रादुर्भाव व लक्षणे आढळल्याने तालुका व आपत्ती व्यवस्थापन समितीमार्फत रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणारा महत्वाचा पूल

म्हसळा : कोरोना विषाणू प्रभावित क्षेत्रातून रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात प्रादुर्भाव व लक्षणे आढळल्याने तालुका व आपत्ती व्यवस्थापन समितीमार्फत रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणारा महत्वाचा पूल पूर्णतः बंद करण्यात आला आहे.  मंडणगड आणि दापोली तालुक्यात मुंबईहून आंबेतमार्गे पायवाटेने चालत आलेल्या मुंबईकर चाकरमन्यांमध्ये कोरोनाची लक्षणे शासकीय तपासा दरम्यान आढळून आल्याने जिल्ह्यांना जोडणाऱ्या आंबेत पुलावरील मुख्य मार्ग हा संपूर्णतः बंद करण्यात आला आहे. आता या पुलावरून कोणालाही प्रवेश करता येणार नाही, असे आपत्ती व्यवस्थान समिती तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी खामकर यांनी सांगितले.

यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून रायगड रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये मुख्य महामार्ग व सागरी महामार्ग तसेच इतर जिल्ह्यातून रत्नागिरी जिल्ह्यात येणाऱ्या रस्ते वाहतुकीला रत्नागिरी तसेच रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी बंदचे आदेश दिले आहेत. दुसरीकडे या दोन्ही जिल्ह्यांचा मुख्य मार्ग असलेल्या या पुलाचा भागच बंद केल्याने नागरिकांमध्ये मात्र तीव्र संताप व्यक्त केला जातोय. या दोन्ही जिल्ह्यांच्या सीमेवर असलेली आंबेत आणि म्हाप्रळ ही गावे पूर्णतः सर्वतोपरी एकमेकांच्या देवाण-घेवाण पद्धतीवर अवलंबून असून या विभागात रेशनिंग दुकाने, दवाखाने, भाजीमार्केट, फलोत्पादन, मेडिकल, बँक या पलीकडे असल्याने नागरिकांनी याच गोष्टीचा विचार करत बंद करण्यात आलेल्या पुलावर तीव्र संताप व्यक्त केला. यावेळी दोन्ही जिल्ह्यांच्या सीमेवरील नागरीकांनी शासनाच्या या चुकीच्या धोरणाचा तसेच नागरिकांना विचारात न घेता नाकाबंदी करण्यात आल्याबाबत नाराजी व्यक्त केली. यावरून अनेक प्रसंगांना भेडसावणाऱ्या प्रश्नांची शासनाने योग्य दखल घेत हातावर पोट असलेल्या मोल मजुरांचा देखील या पुलावरून ये जा करत उदरनिर्वाह चालू असतो. त्यामुळे पूर्णतः बंद करण्यात आलेल्या या निर्णयाला या मजुरांवर उपासमारीची वेळ येईल हे मात्र निश्चित असे मत सामाजिक कार्यकर्ते फरीद डावरे यांनी व्यक्त केले.

सध्या आंबा फळाची निर्यात सुरू असून कोकणातील हापूस हा जास्तीत जास्त मुंबईतील एपीएमसी मार्केटला जात असतो. त्यामुळे कोंकणातील शेतकरी हा या फळावर जास्तीत जास्त अवलंबून असतो आणि त्यावर तो त्याचा उदरनिर्वाह चालवत असतो परंतु मुंबई दिशेला जाणारा मुख्य मार्ग असलेल्या आंबेत पुलाची वाहतूक पूर्णतः बंद केल्याने अशा फळव्यापारी, बागायतदारांवर खूप मोठे संकट आले असून त्यांना आता कशेडी मार्गे मुंबई कडे प्रवास करावा लागणार आहे. यामध्ये जवळजवळ १०० ते १२० किमीचा अंतर जास्त कापावे लागणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आंबेत म्हाप्रळ पूल हा पूर्णतः वाहतुकीस तसेच आर्थिक व्यवहारासाठी बंद करण्यात आला असून आंबेत येथील नागरिकांना आता चक्क गोरेगाव गाठावे लागणार असून जिथे २ किमी अंतरावर काम होत होते तिथे आता १४ किमी अंतर पार करून आपली कामे करण्यास हेलपाटे मारावे लागणार असल्याने आंबेत, म्हाप्रळ परिसरातील जनतेमध्ये नाराजीचे वातावरण आहे.