दापोलीच्या किनाऱ्यावर भरकटले अमेरीकन स्थलांतरीत पक्षी ; दोन महीने करावी लागणार सुश्रुषा

आज रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील दापोली (Dapoli) तालुक्यातील लाडघर समुद्र किनाऱ्यावर उत्तर अमेरीका येथून स्थलांतर करीत असलेला मास्क बुबिझ हा समुद्री पक्षी भरकटलेल्या अवस्थेत आढळुन आला. महाड (Mahad) येथील सीस्केप संस्थेचे प्रतिनिधी चिंतन वैष्णव, प्रेमसागर मेस्त्री, योगेश गुरव, दापोली येथील चिन्मय वैशंपायन यांनी या पक्षाची देखरेख सुरु केली असून सध्या डॉ उमेश वैशंपायन वैशंपायन यांच्या घरी त्याचेवर उपचार सुरु आहेत.

महाड : आज रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील दापोली (Dapoli) तालुक्यातील लाडघर समुद्र किनाऱ्यावर उत्तर अमेरीका येथून स्थलांतर करीत असलेला मास्क बुबिझ हा समुद्री पक्षी भरकटलेल्या अवस्थेत आढळुन आला. महाड (Mahad) येथील सीस्केप संस्थेचे प्रतिनिधी चिंतन वैष्णव, प्रेमसागर मेस्त्री, योगेश गुरव, दापोली येथील चिन्मय वैशंपायन यांनी या पक्षाची देखरेख सुरु केली असून सध्या डॉ उमेश वैशंपायन वैशंपायन यांच्या घरी त्याचेवर उपचार सुरु आहेत. हवामानातील बदलामुळे गेले दोन दिवस संपूर्ण कोकण किनारपट्टीसह महाराष्ट्रात सर्वत्र मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडत आहे. या अवकाळी पावसाने भातपिकासह अनेक भाजीपाला व इतर पिकांवर संकट कोसळलेले असताना अनेक देशविदेशातून स्थलांतर करणाऱ्या पक्षांवर देखील विपरीत परीणाम होत आहे.

समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे वेगवान वारे तयार झाल्याने अशा अनेक स्थलांतरीत पक्षांना जीव गमवावा लागतो. तर काहींच्या स्थलांतरीत मार्गात अडथळा निर्माण होतो. सुदैवाने काल रात्री हा वेगळा पक्षी सोमेशप्रीत हॉटेल समोरील बीचवर देवेंद्र बावकर यांच्या नजरेत आल्याने त्यांनी महाड येथील सीस्केप संस्थेत संपर्क साधला. कालपासून या पाहूण्याला सोमेश प्रीत हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी मासे खाऊ घातल्याने आज तो चांगला चालू लागला आहे‌. या पक्षाची जन्मल्यानंतरची ही पहीलीच आकाशभरारी असल्याने आता किमान दोन महीने त्याची सुश्रूषा करावी लागेल असा अंदाज सीस्केपचे अध्यक्ष पक्षीशास्त्रज्ञ प्रेमसागर मेस्त्री यांनी वर्तवला आहे. खरतर हा पेलाजिक बर्ड म्हणजेच खोल समुद्री पट्ट्यातून प्रवास करणारा पक्षी आहे. तो विश्रांती साठी समुद्रातील बेटांवर थांबतो किंवा पाण्यावर तरंगत विश्रांती घेतो. महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर सहसा तो थांबत वा येत नाही.

मास्क बुबीझ हा पक्षी उत्तर ते दक्षिण अमेरीकेत आढळून येतात. तीन ते चार हजार किलोमीटरचा प्रवास करीत हवामानाच्या बदलाप्रमाणे ते स्थलांतरीत होत असतात. हा समुद्रपक्षी असल्याने समुद्रातील बेटांवर यांच्या वसाहती दिसतात. सीस्केपचे अध्यक्ष प्रेमसागर मेस्त्री यांनी हा पक्षी अंदमान निकोबार बेटावर ईला फाऊंडेशनच्या समुद्रीय सर्वेक्षण मोहीमेत पहायला मिळाल्याचे सांगितले. अशा प्रकारे वाऱ्याच्या बदलत्या प्रवाहात हे मास्क बुबी चे हे पिल्लू असे भरकटणे म्हणजे समुद्राच्या पटलावर विविध प्रकारची स्थित्यंतरे होत असल्याचे द्योतक आहे. याचा परीणाम मानवी जीवन, शेती, बागायती यावर होऊ शकतो असेही यावेळी मेस्त्री यांनी सांगितले.