attack on dhanaji gurav

महाड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. धनाजी गुरव यांच्यावर आज महाविद्यालयातच महेंद्र घारे यांनी(attack on dr. babasaheb ambedkar college principal) प्राणघातक हल्ला केला. जखमी डॉ. गुरव यांच्यावर महाड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

रोहन शिंदे, महाड: महाड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. धनाजी गुरव यांच्यावर आज महाविद्यालयातच महेंद्र घारे यांनी(attack on dr. babasaheb ambedkar college principal) प्राणघातक हल्ला केला. जखमी डॉ. गुरव यांच्यावर महाड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान या हल्लेखोरांना पकडण्याच्या प्रयत्न करणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्यालाही मारहाण करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणी महेंद्र घारे, महेंद्र वानखेडे यांच्यासह पाच ते सहा अज्ञात हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शुक्रवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास प्राचार्य डॉ. धनाजी गुरव हे महाविद्यालयातील रूम नं. १५ मध्ये असलेल्या सभागृहामध्ये बैठक घेत असताना, अचानक महेंद्र घारे आणि त्याच्या साथीदारांनी लाठ्याकाठ्या आणि लोखंडी रॉड घेत या सभागृहात प्रवेश केला. त्यांनी डॉ. गुरव यांना मारहाण करीत सभागृहातील सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले. या हल्ल्यामध्ये डॉ. धनाजी गुरव यांच्या हाताला आणि पायाला गंभीर स्वरूपाची दुखापत झाली आहे. त्यांच्यावर महाड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

दरम्यान, हा हल्ला होत असताना या ठिकाणी बंदोबस्तासाठी तैनात असलेले पोलीस कर्मचारी गजानन शिंदे यांनी या हल्लेखोरांना पकडण्याचा प्रयत्न केला असता अज्ञात हल्लेखोरांना त्यांच्या पाठीतही लोखंडी रॉड मारून त्यांनाही दुखापत केली. जखमी डॉ. गुरव आणि पोलीस कर्मचारी शिंदे यांच्यावर महाड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

डॉ. धनाजी गुरव यांनी या प्रकरणी महाड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. प्राचार्यपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर इतर लोकांना प्राचार्य होता येत नाही आणि महाविद्यालयाच्या पैशांवर डल्ला मारता येत नाही. याचा राग धरून हा हल्ला करण्यात आल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी शहर पोलिसांनी महेंद्र घारे (वय ३३, रा. सुंदरवाडी, महाड), महेंद्र वानखेडे (महाड) या दोघांसह पाच ते सहा अज्ञात इसमांविरोधात भादंवि क. ३०७, १२० ब, १४३, १४७, १४८, १४९, ३५३, ३३२, ४२७, ४५२, ५०४, ५०६ सह क्रीमिनल लॉ अमेनन्डन्ट अक्ट १९३२ चे कलम ७ व सार्वजनिक संपत्तीस हानी व प्रतिबंध अधिनियम १९८४ चे कलम ३ (१) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अधिक तपास महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक शैलेश सणस हे करीत आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे महाडमधील डॉ .बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात गेल्या बारा वर्षापासून प्राचार्य पदावरून वारंवार वाद होत असून याठिकाणी अनेक वेळा जीवघेणे हल्ले होत विद्येचे माहेर घर गावगुंडांचा अड्डा बनला आहे. अनेक वेळा प्राचार्य पदासाठी अक्षरशः स्पर्धा चालू असल्याचे समोर येते. कधी धनाजी गुरव, कधी आरती वानखेडे ,कधी सुरेश आठवले, तर कधी मेहता असे या महाविद्यालयाला प्राचार्य म्हणून आले. मात्र प्रत्येक वेळी याठिकाणी कोणत्या ना कोणत्या स्वरूपाचा वाद समोर आला आहे. महाड आंबेडकर कॉलेज मध्ये सततचे हल्ले पाहता सध्या येथे पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

शिवसेना स्टाईलने करु गुंडांचा बंदोेबस्त

या घटनेची गंभीर दखल घेत महाड पोलादपुर माणगावचे आमदार भरत गोगावले यांनी विद्यालयात जाऊन पाहणी केली. त्याचप्रमाणे प्राचार्य धनाजी गुरव यांचीदेखील दवाखान्यात जाऊन विचारपूस केली. यावेळी माध्यमांशी बोलत असता आमदार गोगावले यांनी स्पष्ट केले की, वारंवार घडणारे प्रकार हे घातक असून यापुढे अशाप्रकारे जर कोणी हमले करणार असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. जर प्रशासनाच्या मार्फत कारवाई झाली नाही तर आम्ही शिवसेना स्टाईलने संबंधित गुंडांचा बंदोबस्त करू,असा सज्जड दम देखील आमदार गोगावले यांनी दिला आहे.