भारतीय जनता युवा मोर्चा करणार स्वदेशीचा जागर

पनवेल : ‘आत्मनिर्भर युवा - आत्मनिर्भर भारत’ उपक्रमाद्वारे युवकांमध्ये विदेशी बनावटीच्या वस्तूंऐवजी स्वदेशी विकल्पाबद्दल प्रसार प्रचार करण्यासंदर्भात भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाभरात

पनवेल : ‘आत्मनिर्भर युवा – आत्मनिर्भर भारत’ उपक्रमाद्वारे युवकांमध्ये विदेशी बनावटीच्या वस्तूंऐवजी स्वदेशी विकल्पाबद्दल प्रसार प्रचार करण्यासंदर्भात भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाभरात युवकांमध्ये जागृती करणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर यांनी दिली. भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाने प्रभावित होऊन भाजपाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संकल्पनेतून ‘आत्मनिर्भर युवा – आत्मनिर्भर भारत’ या स्वदेशी वस्तूंचा वापर रोजच्या जीवनात वाढविण्यासाठीचा उपक्रम भारतीय जनता युवा मोर्चाने हाती घेतला आहे. चीनी बनावटीच्या वस्तूंवरील बहिष्कार करताना जिल्हाभरातील युवकांमध्ये भारतीय बनावटीच्या वस्तू वापरण्यासाठीचा सकारात्मक प्रचार व प्रसार करण्यासाठी या उपक्रमाद्वारे युवा मोर्चाचे कार्यकर्ते सज्ज झाले आहेत. 

देशाच्या  ७५व्या स्वातंत्र्यदिनापर्यंत रोजच्या जीवनात वापरल्या जाणाऱ्या वस्तूंपैकी किमान ७५% भारतीय बनावटीच्या (मेड इन इंडिया) वस्तूंचा वापरण्याचा निर्धार करण्यासाठी रविवार दिनांक २१ जून २०२० रोजी जागतिक योग दिनाचे औचित्य साधून आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांसमवेत शेकडो युवक ऑनलाईन प्रतिज्ञा घेणार आहेत. हिंदुस्थान लिव्हर (युनिलिव्हर) सारख्या अनेक नामांकित कंपन्या आता भारतात स्वत:चे उत्पादन बनवतात. भारताबाहेर बनणाऱ्या उत्पादनातून परदेशातील लोकांना रोजगार मिळवण्याची व पैसा कमावण्याची संधी देण्यापेक्षा अशा वस्तुंचे भारतात बनणारे उत्तम दर्जाचे व किफायतशीर पर्याय कोणते याची माहिती देणारे व जनजागृती करणारे “आत्मनिर्भर युवा, आत्मनिर्भर भारत” या नावचे फेसबुक पेज व ग्रुप युवा मोर्चाने तयार केलेले आहे. 

या  फेसबुक पेजवर कोणीही चौकशी केल्यास आपल्याला लागणाऱ्या वस्तूंचा भारतात तयार होणारा विकल्प देखील सुचवला जाईल, अशी व्यवस्था भाजयुमोच्या पदाधिकाऱ्यांनी केलेली आहे. प्रसिद्ध शिक्षणतज्ञ, देशावर निस्सीम प्रेम करणारे लडाखचे सोनम वांगचूक यांनी चीनला नमविण्यासाठी ‘वाॅलेट से मारेंगे चीन को’ असे आवाहन देशाला केले आहे. त्यासाठी प्रत्यक्ष पुढाकार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता युवा मोर्चा रायगडचे पदाधिकारी व कार्यकर्ते घेत आहेत.