अखेर कोरोनामुक्त झालेल्या भोस्ते गावातील सील काढल्याने नागरिकांना दिलासा

श्रीवर्धन : कोरोना सदृश्य लक्षणे आढळल्यामुळे भोस्ते गावातील एका रुग्णाला १२ एप्रिल रोजी पनवेल येथे उपचारासाठी पाठविण्यात आले होते. या रुग्णाचा स्वॅब घेतल्यानंतर १८ एप्रिल रोजी हा रुग्ण कोरोना

श्रीवर्धन : कोरोना सदृश्य लक्षणे आढळल्यामुळे भोस्ते गावातील एका रुग्णाला १२ एप्रिल रोजी पनवेल येथे उपचारासाठी पाठविण्यात आले होते. या रुग्णाचा स्वॅब घेतल्यानंतर १८ एप्रिल रोजी हा रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. त्याच दिवशी श्रीवर्धन तालुका प्रशासनाने संपूर्ण भोस्ते गाव सील करून टाकले व त्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या २८ व्यक्तींना तपासणीसाठी पनवेल येथे पाठवले. या २८ व्यक्तींपैकी त्या रुग्णाची पत्नी व तीन मुले कोरोना पॉझिटिव्ह आली. उर्वरित २४ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना विलगीकरणात ठेवण्यात आले होते. एका आठवड्यातच या रुग्णाच्या तीन मुलांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्यामुळे भोस्ते गावात आणण्यात आले. त्यांनादेखील विलगीकरणात ठेवण्यात आले होते. त्यानंतर १४ दिवसांनी त्या रुग्णाची पत्नीदेखील कोरोना निगेटिव्ह आल्याने तिलादेखील गावात आणून विलगीकरणात ठेवण्यात आले होते. त्यानंतर अजून आठ दिवसांनंतर सदर रुग्णाचा देखील कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्यामुळे त्याला देखील गावांमध्ये आणून विलगीकरणात ठेवण्यात आले होते. श्रीवर्धन तालुक्यात सापडलेले पाचही कोरोना रुगणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यामुळे श्रीवर्धन तालुका कोरोना मुक्त झाला होता. परंतु प्रशासनाकडून भोस्ते गावाला लावण्यात आलेले सील काढण्यात येत नव्हते. याबाबत वृत्तपत्रांमध्ये बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर काल १६ एप्रिलला भोस्ते गावातील सील काढण्यात आले. यावेळी पोलिसांनी व प्रशासनाकडून नागरिकांना विविध सूचना दिल्या. ज्या लोकांना विलगीकरण करून ठेवण्यात आलेले आहे अशांना कोणीही भेटू नये व जे विलगीकरणात आहेत त्यांनी घराबाहेर पडू नये. जर असे करताना कोणी आढळल्यास त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. सलग २८ दिवस घरामध्येच बसून राहिलेल्या भोस्ते गावातील नागरिकांना सील काढल्यामुळे दिलासा मिळाला आहे.