भोस्ते ग्रुप ग्रामपंचायतीचा अजब कारभार, तीन गावे वगळून एका गावातल्याच १२ जणांना लॉकडाऊन देखरेखीचा अधिकार

श्रीवर्धन:श्रीवर्धन तालुक्यातील भोस्ते ग्रुप ग्रामपंचायतीने अजब कारभाराचा नमुनाच सगळ्यांसमोर सादर केला आहे. या ग्रुप ग्रामपंचायतीत खेर्डी, भट्टीचा माळ, बौद्धवाडी, व भोस्ते ही चार गावे समाविष्ट

श्रीवर्धन: श्रीवर्धन तालुक्यातील भोस्ते ग्रुप ग्रामपंचायतीने अजब कारभाराचा नमुनाच सगळ्यांसमोर सादर केला आहे. या ग्रुप ग्रामपंचायतीत खेर्डी, भट्टीचा माळ, बौद्धवाडी, व भोस्ते ही चार गावे समाविष्ट आहेत. ग्रुप ग्रामपंचायत असल्याने प्रत्येक गोष्टींमध्ये या चारही गावांचा समावेश असणे अत्यंत आवश्यक आहे. सध्या सर्वत्र कोरोना व्हायरसमुळे  लॉकडाऊन आहे. या लॉकडाऊनवर देखरेख ठेवण्यासाठी गावातील १२ जणांची समिती गठीत करण्यात आली आहे. मात्र फक्त भोस्ते गावातीलच १२ जण या समितीवर घेण्यात आले असून भट्टीचा माळ, बौद्धवाडी, खेर्डी या गावातील कोणालाही या समितीमध्ये घेण्यात आलेले नाही. देखरेखीसाठी नेमलेल्या समितीचे सदस्य गळ्यामध्ये ओळखपत्र घालून सर्रासपणे श्रीवर्धनमध्ये फिरताना दिसतात. अन्यत्र कुठेही जाताना दिसत नाही. त्यामुळे बाकीच्या गावांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये समाविष्ट असलेल्या सर्व गावांमधून यासाठी सदस्य घेणे गरजेचे होते. मात्र या ग्रामपंचायतीचे कार्यभार असलेले सरपंच व ग्रामसेवक यांनी तसे न करता फक्त भोस्ते गावातीलच बारा जणांना ओळखपत्र दिले आहेत. त्यामुळे भट्टीचा माळ, बौद्धवाडी, व खेरडी गावातील ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. तरी श्रीवर्धन तहसीलदारांनी याबाबत योग्य लक्ष घालून खेर्डी,भट्टीचा माळ, बौद्धवाडी या ठिकाणचे देखील सदस्य या समितीमध्ये घ्यावेत, अशी मागणी या तिन्ही गावांच्या नागरिकांमधून करण्यात येत आहे.