भोस्ते गावातील व्यवहार लवकर सुरु करण्याची मागणी

श्रीवर्धन: श्रीवर्धन शहरापासून फक्त तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या भोस्ते गावामध्ये १८ एप्रिलमध्ये कोरोनाचा रुग्ण सापडल्यानंतर एकच खळबळ उडाली होती व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. याबाबत

श्रीवर्धन: श्रीवर्धन शहरापासून फक्त तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या भोस्ते गावामध्ये १८ एप्रिलमध्ये कोरोनाचा रुग्ण सापडल्यानंतर एकच खळबळ उडाली होती व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. याबाबत सविस्तर वृत्त असे की, ४ एप्रिलच्या दरम्यान वरळी जनता कॉलनी येथून एक कुटुंब आपल्या मूळ गावी भोस्ते या ठिकाणी खाजगी गाडी करून आले होते. ७ एप्रिलच्या दरम्यान त्या घरातील कुटुंब प्रमुख असलेल्याला सर्दी, खोकला, ताप इत्यादी त्रास जाणवू लागल्यामुळे श्रीवर्धन शहरातील एका खासगी दवाखान्यात नेण्यात आले. मात्र या व्यक्तीचा आजार आटोक्यात येत नसल्यामुळे त्याला खाजगी डॉक्टरने शासकीय रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. श्रीवर्धनच्या उपजिल्हा रुग्णालयात गेल्यानंतर या रुग्णाची लक्षणे कोरोना सदृश आढळून आल्यामुळे डॉक्टरांनी त्याला पनवेल येथे हलविले. या रुग्णाची तपासणी केली असता तो कोरेना पॉझिटिव्ह असल्याचे १८ एप्रिल रोजी निष्पन्न झाले. त्यानंतर त्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या २८ जणांना कोरोनाच्या टेस्टसाठी पनवेल येथे नेण्यात आले. २८ पैकी चार जणांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली तर उर्वरित २४ जणांची निगेटिव्ह टेस्ट आल्यामुळे त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले होते. तसेच या २८ जणांच्या संपर्कात आलेल्या  जवळजवळ पावणेदोनशे लोकांनादेखील होमक्वारंटाईन करण्यात आले होते. चार पॉझिटिव्ह आलेले रुग्ण हे सदर पॉझिटिव्ह रुग्णाची पत्नी व तीन मुले होती. या रुग्णाची पत्नी व तीन मुले यांची टेस्ट आता निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना होते या गावांमध्ये आणून होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. परंतु या कुटुंबप्रमुखाची कोरोना टेस्ट अद्याप निगेटिव्ह आलेली नसल्यामुळे भोस्ते गावाला लावण्यात आलेले सील अद्यापही उघडण्यात आलेले नाही. गावातील नागरिकांचे सर्व व्यवहार, व्यवसाय-धंदे ठप्प झालेले असून अनेकांच्या घरांची कामे अर्धवट अवस्थेत आहेत. पावसाळा जवळ येत आहे अशा परिस्थितीत गावातील सील काढल्यानंतर कामे पूर्ण होणे देखील अशक्य वाटत असल्याने नागरिकांमधून लवकरात लवकर व्यवहार सुरू करण्याची मागणी केली जात आहे.