“एकाही कामगारावर अन्याय झाल्यास टोकाची भूमिका घेऊ”, भाजपा नेते प्रवीण दरेकर यांचा इशारा

रोहा : रोहा एमआयडीसीमधील कुठलीही कंपनी आम्हाला बंद करायची नाही, पण येथील एकाही कामगारावर जर अन्याय झाला तर मात्र भारतीय जनता पार्टी स्वस्थ बसणार नाही व आम्ही त्या कामागाराच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभे राहू. अन्यायग्रस्त कामगारांचा प्रश्न सामोपचाराने व चर्चेच्या माध्यमातून सोडविण्याची आमची तयारी आहे, पण व्यवस्थापनाने वा कंपनी प्रशासनाने मुजोरीपणा दाखविली आणि कामगारांवर पुन्हा अन्याय झाला तर मात्र त्या कंपनीविरुध्द न्यायासाठी लढा उभारून आम्ही टोकाची भूमिका घेऊ असा जोरदार इशारा विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज दिला. यावेळी येथील कंपनीचे कामगार तसेच भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

रोहा एमआयडीसीमधील एल्पे कंपनीमधील दिनेश भोगटे या कामगारावर अन्याय झाला आहे. कामगारावर झालेल्या अन्यायाविरोधात आज विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्यावतीने मोर्चा काढून कंपनीवर धडक देण्यात आली. कामावरुन काढण्यात आलेल्या कामगाराच्या प्रकरणी त्या कंपनीच्या व्यवस्थापनाला विरोधी पक्ष नेते दरेकर यांनी जाब विचारला. याविषयी कंपनीच्यावतीने संचालिका प्राची बारदेस्कर व एचआर मॅनेजर संजय देशमुख यांनी विरोधी पक्ष नेते दरेकर यांच्याशी सविस्तर चर्चा केली. ही चर्चा सकारत्मक झाली असून येत्या दोन दिवसात यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन कंपनीच्या वतीने देण्यात आल्याची माहिती दरेकर यांनी दिली.

तत्पूर्वी प्रविण दरेकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या रायगड जिल्हाच्या वतीने कंपनीवर मोर्चा काढण्यात आला. यावेळी शेकडो कामगारांनी कंपनीच्या गेटवर धडक दिली. यावेळी या मोर्च्याला मार्गदर्शन करताना दरेकर यांनी सांगितले की, भारतीय जनता पार्टी सदैव कामगारांच्या पाठीशी आहे. एल्पे कंपनीच्या प्रशासनाने कागमारांवर विविध प्रकारे अन्याय चालविला आहे. त्यांना वेठबिगाराप्रमाणे वागणूक दिली जात असल्याच्या अनेक तक्रारी आपल्याकडे आल्या आहेत. त्यामुळे कंपन्यांची अशी मुजोरी यापुढे खपवून घेतली जाणार नाही. कामगारांना दाबण्याचा व चेपण्याचा प्रयत्न कोणती कंपनी करत असेल व कंपनीने कामगारांवर अन्याय केला तर भारतीय जनता पक्षाची पहिली लाथ त्या कंपनीवर पडली पाहिजे. यासाठी कामगारांच्या बाजूने उभे राहण्याचे आवाहन त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना केले. 

कामगारांनीही चुकूनही चुकीचे वर्तन करू नका. चांगल्या प्रकारे काम करा. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मेक इन इंडियाचे धोरण आहे. त्यामुळे आपल्या चुकीच्या वतर्नानाने चांगले कारखाने बंद पडणार नाहीत याची दक्षता घ्या. कारण कामगार टिकला तर मेक इंडिया यशस्वी होऊ शकतो, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. 

कंपनीतून काढून टाकलेल्या कामगाराच्या वाचा फोडण्यासाठी काढण्यात आलेल्या मोर्च्यामध्ये आमदार रवीशेठ पाटील, भाजपचे रायगडचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.महेश मोहिते,  भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष अमित घाग, वैकुंठ पाटील, राजेश मापारा, तालुकाध्यक्ष सोपान जांबेकर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.