पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कार्य रायगड जिल्ह्यातले भाजप कार्यकर्ते घरोघरी पोहोचविणार

पनवेल : मोदी सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्याने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेच्या हितासाठी केलेले लोकल्याणकारी कार्य रायगड जिल्हयातील भाजप कार्यकर्ते सोशल डिस्टन्सिंग पाळून घरोघरी

 पनवेल : मोदी सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्याने  देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेच्या हितासाठी केलेले लोकल्याणकारी कार्य रायगड जिल्हयातील भाजप कार्यकर्ते सोशल डिस्टन्सिंग पाळून घरोघरी पोहोचवणार आहेत.  दुसऱ्या टर्ममध्ये ३० मे रोजी मोदी सरकारला एक वर्ष पूर्ण झाले. या काळात ३७० कलम रद्द करणे, श्रीराममंदिर उभारणीस प्रारंभ, आधुनिक समाज व्यवस्थेत अडसर बनलेला तीन तलाक रद्द करणे, जागतिक कोरोना महामारीस रोखण्यासाठी केलेले ठाम निर्णय, भारताच्या संवेदनशीलतेचे प्रतीक बनलेला नागरिकत्व सुधारणा कायदा, किसान सन्मान योजने अंतर्गत ९.५ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात ७२००० कोटी रुपयांच्या निधीचे वाटप, असंघटित क्षेत्रातील व्यक्तींसाठी पेन्शन, अशा एक ना अनेक योजनेच्या माध्यमातून मोदी सरकारने केलेले हे सर्व काम जनतेपर्यंत पोहोचवण्याचा निर्णय प्रदेश भाजपने घेतला आहे. सोशल डिस्टन्सिंग पाळून ३० मे ते ३० जून काळात  भाजप कार्यकर्ते केंद्र सरकारच्या कामांची जनतेपर्यंत पोहोचवणार आहेत .पक्षाच्या विविध आघाड्या, सेलच्या माध्यमातून मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप करण्यात येणार आहेत. तसेच इंटरनेटच्या माध्यमातून जनसंवाद साधण्यात येणार आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेसाठी लिहिलेल्या पत्राच्या माध्यमातून १ लाख कुटुंबांपर्यंत संपर्क करण्यात येणार आहे. जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली उत्तर रायगडमध्ये विधानसभेचे ३ मतदार संघ असून २ भाजपकडे आहेत. पनवेलमध्ये या अभियानात आमदार प्रशांत ठाकूर सहभागी होणार असून उरणमध्ये आमदार महेश बालदी हे काम करणार आहेत. कर्जतमध्ये जिह्याचे संघटन सरचिटणीस अविनाश कोळी हे नेतृत्व करणार असून यासाठी सर्व तालुका मंडल,शहर मंडलमध्ये अभियान प्रमुख व सहप्रमुख अशी बुथस्तरापर्यंत रचना पूर्ण झाली आहे, अशी माहिती भाजपचे जिल्हा सरचिटणीस व जनसंपर्क अभियान जिल्हा संयोजक दीपक बेहेरे, जिल्हा उपाध्यक्ष व जनसंपर्क अभियान सह संयोजक प्रल्हाद केणी यांनी दिली आहे.