वाढीव वीज बिल विरोधात भाजयुमोचे ४ ऑगस्टला टाळेबंद आंदोलन

  • कोरोना महामारीच्या संकट काळातही अतिरिक्त विद्युत भार, वाढीव बिले, घर बंद असूनही आलेले बिल व इतर तांत्रिक विषयांवर भाजप पदाधिकार्‍यांकडे नागरिकांनी अनेक तक्रारी केल्या आहेत. यासंबंधी स्थानिक विद्युत मंडळाच्या अधिकार्‍यांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी ज्या तक्रारदारांची पत्रे प्राप्त झाली आहेत त्यांचा वीजपुरवठा पडताळणी होईपर्यंत खंडित होणार नाही, असे आश्वासनदेखील दिले होते, परंतु कुठल्याही प्रकारची कार्यवाही होत नसल्याने पनवेलच्या जनतेचा रोष वाढतच आहे.

पनवेल :  कोरोनाच्या संकटकाळात रीडिंग न घेता सरासरी  रीडिंगचे बिल व त्यावर  आकारण्यात आलेल्या अतिरिक्त वीजभारामुळे जास्त वीज बिल आल्याने पनवेलमधील नागरिक हैराण झाले आहेत. सदर बिले सुधारून मिळावीत यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता युवा मोर्च्याचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमवेत महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या पनवेल-भिंगारी येथील कार्यालयासमोर मंगळवार  ४ ऑगस्ट रोजी टाळेबंद आंदोलन करण्याचा  इशारा भारतीय जनता युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर यांनी दिला आहे

कोरोना महामारीच्या संकट काळातही अतिरिक्त विद्युत भार, वाढीव बिले, घर बंद असूनही आलेले बिल व इतर तांत्रिक विषयांवर भाजप पदाधिकार्‍यांकडे नागरिकांनी अनेक तक्रारी केल्या आहेत. यासंबंधी स्थानिक विद्युत मंडळाच्या अधिकार्‍यांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी ज्या तक्रारदारांची पत्रे प्राप्त झाली आहेत त्यांचा वीजपुरवठा पडताळणी होईपर्यंत खंडित होणार नाही, असे आश्वासनदेखील दिले होते, परंतु कुठल्याही प्रकारची कार्यवाही होत नसल्याने पनवेलच्या जनतेचा रोष वाढतच आहे.

कोरोनाच्या महामारीत अनेकांच्या नोकर्‍या गेल्या आहेत, पगार नाही. पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा वेळी या जाचक वीज बिलांचा भार नागरिकांच्या माथी मारण्याचे काम विद्युत मंडळाकडून केले जात आहे. त्यावर महाविकास आघाडी सरकार मूग गिळून शांत बसले असल्याचा आरोपही भारतीय जनता युवा मोर्चाकडून करण्यात आला आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता युवा मोर्चाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमवेत महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या पनवेल-भिंगारी येथील कार्यालयासमोर  मंगळवार ४ ऑगस्ट रोजी टाळेबंद आंदोलन करण्याचा इशारा भारतीय जनता युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर यांनी दिला आहे