तारीक गार्डन दुर्घटनेतील दोषी बिल्डरची नार्को टेस्ट करावी : विकास गोगावले

महाड : महाड शहरातील तारीक गार्डन ही इमारत निकृष्ट बांधकामामुळे कोसळली असून ही दुर्दैवी घटना आहे या दुर्घटनेस जबाबदार असणाऱ्या बिल्डरची नार्को टेस्ट करून ही इमारत उभारण्यासाठी त्याने कुणा कुणाला टक्केवारीने पैसे दिले याची सखोल चौकशी करावी त्याचप्रमाणे तत्कालीन मुख्याधिकारी झिंजाड व नगर अभियंता दिघे महाराष्ट्रात कुठेही कार्यरत असले तरी त्यांना निलंबित करावे अशी मागणी दक्षिण रायगडचे युवा सेना अधिकारी विकास गोगावले यांनी महाडमधील पत्रकार परिषदेत केली.या पत्रकार परिषदेचे शिवसेनेचे शहर प्रमुख नितीन पावले, महाड नपाचे विरोधी पक्षनेते चेतन पोटफोडे, नगरसेवक सुनिल अगरवाल, युवा सेनेचे शहर अधिकारी सिध्देश पाटेकर इम्रान पठाण आदी उपस्थित होते.

महाडमधील या दुर्घटनेनंतर आ गोगावले यांच्या संपर्कात राहून तातडीने एनडीआरएफ चे पथक पाठवून मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाखाची मदत करून एनडीआरएफची टिम आणखी एक महिना महाड मध्ये ठेवण्यास मान्यता दिल्या बद्दल राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पुर्नवसन मंत्री वेडट्टीवार दुर्घटनेतील दोन मुलांना दत्तक घेऊन त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी उचलून त्यांचे नावे प्रत्येकी १० लाखाची ठेव ठेवणारे मंत्री एकनाथ शिंदे त्याच प्रमाणे यावेळी मदत कार्य करणाऱ्या सर्व सामाजिक संस्था एल अॅन्ड टी कंपनीचे गोगावले यांनी आभार मानले.या दुर्घटनेत जे राहिवाशी बेघर झाले आहेत त्यांची नैतिक जबाबदारी स्विकारून महाड नगर परिषदेने प्रत्येकी २ लाखाची मदत करावी. नगर परिषद सेनेकडे असती तर अशी मदत तातडीने केली असती असे विकास गोगावले यांनी सांगितले .

महाड शहरात बिल्डींगला परवानगी देताना टक्केवारी द्यावी लागते अथवा पार्टनरशिप द्यावी लागते असा आरोप करत गतवर्षी शहरातील अनधिकृत शेड व टपऱ्यांवर कारवाई करणाऱ्या पालिकेने शहारातील १० ते १५ अनधिकृत व धोकादायक इमारतींवर पालिकेने कारवाई का केली नाही असा सवाल गोगावले यांनी केला.
शहरासह ग्रामीण भागातील सर्व धोकादायक इमारतीचे स्ट्रक्चर ऑडीट करावे व त्याचा खर्च पालिका व स्थानिक स्वराज्य संस्थेने उचलावा त्याच प्रमाणे धोकादायक इमारतींमधील रहिवाशांच्या राहण्याची व्यवस्था पालिकेने करावी अशी मागणी गोगावले यांनी केली. महाड शहरातील अनधिकृत व धोकादायक इमारतींवर कारवाईची मागणी सभागृहात शिवसेना नगरसेवकांकडून करण्यात आली होती असेही गोगावले यांनी स्पष्ट केले. राष्ट्रीय स्मारकात ज्या बेघर रहिवाशांची व्यवस्था करण्यात आली आहे ती जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार केली आहे त्याचा पालिकेशी काहीही संबंध नाही असे गोगावले यांनी स्पष्ट केले असून या ठिकाणी काय व्यवस्था आहे याची आपण पाहणी करणार आहोत असे गोगावले यांनी सांगितले.

महाड बिल्डर असोसिएशनने कुणाच्याही दबावाला बळी न पडता काम करावे आ भरतशेठ गोगावले त्यांच्या पाठीशी आहेत असे आश्वासन विकास गोगावले यांनी यावेळी दिले ज्या एल अॅन्ड टी कंपनी विरोधात केल्या जाणाऱ्या रस्त्याचे कामाबाबत आरोप केले जात होते तीच एल अँन्ड टी कंपनी महाड एमआयडीसी मध्ये प्रिव्ही कंपनी ला आग लागली तेव्हा आणि महाडमधील इमारत दुर्घटनेच्या वेळी मदतीसाठी धावून आली जिल्हा प्रशासनाने या कंपनीचा जाहीर सत्कार करावा अशी मागणी गोगावले यांनी केली.या इमारत दुर्घटने नंतर आ गोगावले, पालकमंत्री आदिती तटकरे या रात्रभर मदत कार्यावर लक्ष ठेवून होत्या दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजे पर्यत थांबून पुन्हा सायंकाळी मंत्री महोदयांसोबत आ गोगावले हजर झाले. मात्र महाड च्या नगराध्यक्षा शहरात असून देखील फिरकल्या नाहीत त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विकास गोगावले यांनी केली.