राज्य शासन रायगड आणि चवदार तळे पर्यटकांसाठी खुले करणार का ?

महाड: किल्ले रायगड(raigad fort) व चवदार तळे हे पर्यटकांसाठी(tourists) खुले करावे या मागणीसाठी महाडमधील पत्रकार मनोज खांबे हे १९ सप्टेंबर रोजी किल्ले रायगडाच्या पायथ्याशी उपोषणाला बसणार आहे पत्रकार खांबे यांनी केलेल्या मागणीवर चर्चा करण्यासाठी महाडचे तहसिलदार यांचे दालनात पुरातत्व विभाग, महाड नगर परिषद, महाड पंचायत समिती व पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली होती.

यावेळी राज्य शासनाची परवानगी(permission of state government) असेल तर किल्ले रायगड व चवदार तळे येथे पर्यटकाना असणारी प्रवेश बंदी हटविण्यास आमची कोणतीही हरकत नसल्याचे पुरातत्व विभाग व महाड नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. त्यावर तहसिलदार काशिद यांनी जिल्हाधिकाऱ्यांना या बैठकीचा अहवाल कळवून त्यांचा निर्णय पत्रकारांना कळविण्यात येईल, असे आश्वासन दिले.

यावेळी पत्रकार मनोज खांबे महाड प्रेस असोसिएशनचे अध्यक्ष प्रविण कुलकर्णी, सेक्रेटरी संजय भुवड, सदस्य सचिन कदम, प्रसाद पाटील, सिद्धांत कारेकर पुरातत्व विभागाचे अधिकारी कांबळे महाड नगर परिषदेचे अभियंता सुहास कांबळे, नायब तहसिलदार घेमुड आदी मान्यवर उपस्थित होते.

तहसिलदार काशिद यांनी पुरातत्व विभाग व महाड नगर परिषदेची किल्ले रायगड व चवदार तळे येथील पर्यटकांना प्रवेश बंदी हटविण्याबाबत काय भूमिका आहे हे जाणून घेतली. पुरातत्व विभागाचे अधिकारी कांबळे यांनी पत्रकार खांबे यांनी केलेल्या मागणीचा संदर्भ देत वरिष्ठांकडे विचारणा केली असता राज्य सरकारने ही बंदी हटविण्याची परवानगी दिली तर पुरातत्व विभागाची बंदी हटवायला कोणतीही हरकत नसल्याचे स्पष्ट केले. महाड नगर परिषदेचे अभियंता कांबळे यांनी चवदार तळ्याचा ताबा जरी पालिकेकडे असला तरी हे सार्वजनिक पर्यटन स्थळ असल्याने कोरोनाकाळात या ठिकाणच्या प्रवेशाबाबतचे सर्व निर्णय घेण्याचे अधिकार हे जिल्हाधिकारी यांना असल्याचे सांगितले. त्यांच्याकडून ही बंदी उठवण्याची परवानगी आल्यास महाड नगर परिषदेची कोणतीही हरकत असणार नाही, असे सांगितले.
किल्ले रायगडचा ताबा पुरातत्व विभागाकडे असून चवदार तळ्याचा ताबा महाड नगर परिषदेकडे आहे.या दोन्ही तीर्थस्थळावरील पर्यटकांना असलेली प्रवेश बंदी हटविण्यास या दोन्ही संस्थांची कोणतीही हरकत नाही त्यामुळे ही बंदी हटविण्याचा चेंडू जिल्हाधिकारी रायगड म्हणजे अर्थातच राज्य शासनाकडे गेला आहे. राज्य शासनाने परवानगी दिली तरच या दोन्ही ठिकाणी पर्यटकांना असणारी बंदी हटणार आहे.
दरम्यान पत्रकार खांबे हे आपल्या उपोषणावर ठाम असून त्यांना दिवसेंदिवस अनेकांचा पाठिंबा मिळत आहे. पुरातत्व खाते आणि महाड नगर परिषदेने ही स्थळे पर्यटकांसाठी खुली करण्यास संमती दर्शवल्याने पत्रकार खांबे यांचे हे आंदोलन यशाच्या दिशेने जात आहे.